सह्याद्रीचे वादळ : वीर धारेराव
लेखक: महादु चिंधु कोंडार
Read this story in English
महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका आदिवासी, डोंगराळ व दूर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. अशा या अकोले तालुक्यात ज्या वीरांच्या रक्तातून इतिहास धावला, ज्यांच्या मनगटात रग आणि छातीत धग होती असे राघोजी भांगरा, बापू भांगरा, रामा किरवा, धरमा मुंढा, खंडू साबळा, बुधा पेढेकर व धारेराव असवला या आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्याच्या खूप जुन्या इतिहासाची पार्श्वभूमी या तालुक्याला लाभलेली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात(सन – १८०० ते १८५० च्या दरम्यान) ‘आदिवासी ४० गाव डांगाण’ म्हणून ओळखल्या जाणार्या मुळा व प्रवरा नदी खोर्यातील भागात ‘राजूर’ ही खूपच जुनी व एकमेव मोठी मानाची बाजारपेठ होती. याच परिसरात डोंगरदर्यातील आदिवासी भागात सावकारशाही व इंग्रज राजवटीतील अधिकार्यांनी दुही माजवली होती. रानावनांत राहाणार्या, गोरगरीब आदिवासींच्या कुटुंबात जाऊन धान्य, कोंबड्या व बकरं मागणे; आणि नाही दिले तर धाक दाखवणे, हाणामारी करणे अशा प्रकारचा छळ व त्रास इंग्रज सरकारने नेमलेले अधिकारी करत असत. सावकार अल्प मुदतीचे कर्ज देऊन आदिवासी बांधवांच्या जमिनी ताब्यात घेत असत. पोटाला चिमटा घेऊन जगणार्या कोंडारोंडा, रानभाज्या, जंगली कंदमुळे खाऊन पोट भरणार्या आदिवासींची लेकरं मात्र भाकरीच्या तुकड्यासाठी टाहो फोडायची. परंतु सावकारशाहीला कधीच या दीनदुबळ्या आदिवासींची दया आली नाही. अशा या जाचक, जुलमी इंग्रज राजवट व सावकारशाहीला लगाम घालण्यासाठी सह्याद्रीची वादळं क्रांतिकारकांच्या रूपानं पेटून उठली. अशा या वादळांनी अकोले तालुका व राजूर पंचक्रोशीत १८ व्या शतकात अनेक चळवळी व बंड पुकारले. या आदिवासी क्रांतिकारकांनी इंग्रज राजवट व सावकारशाहीला ‘सळो की, पळो’ करून सोडले; आणि माझ्या आदिवासी समाज्यावर होणार्या अन्यायाला व अत्याचाराला वाचा फोडली. याच कालखंडात क्रांतिकारी चळवळीत व बंडात उडी घेऊन आदिवासी समाज्यासाठी जीवाची बाजी लावणार्या वीर धारेराव या खास आदिवासी रत्नाची पारख आपण या कथेच्या माध्यमातून करून घेणार आहोत.
सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेलं, सह्याद्रीची शान आणि सह्याद्रीचा मान म्हणून नावाजलेलं कुमशेत हे एक आदिवासी गाव. या गावाला निमकोकण असे मी म्हणेल; कारण अकोले तालुक्यात जून महिण्यात कुठेही पावसाची चाहूल नसतांना सुद्धा अगदी कोकण परिसराप्रमाणेच कुमशेत गाव परिसरात जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाच्या हलक्या तर काही अंशी जोरदार सरी बरसू लागतात. त्यामुळे येथील बळीराजा मात्र लवकरच सज्ज होऊन आपल्या भातशेतीची जमीन कसण्यास तयार असतो.
अशा या अतिदूर्गम, डोंगराळ भागात १८ व्या शतकात कुमशेत गावी वीर धारेराव यांचा जन्म एका सामान्य व गरीब शेतकरी कुटुंबात झाला. धारेराव लहानपणापासूनच गुरे राखण्याचे व चारण्याचे काम करत. त्यामुळे निसर्गाशी, झाडाझुडपांशी, डोंगरदर्यांशी नाळ जोडलेल्या या माणसाला परिसराची खडान् खडा माहिती होती.
एकदा रानात गुरे चारत असतांना धारेरावांना कोकतर (रान कोंबडी) दिसली. दगडी गोट्याचा नेम धरून धारेरावांनी त्या रानकोंबडीची शिकार केली. शिकार केलेली रानकोंबडी धारेराव एका वनस्पतीच्या पानांत गुंडाळून सायंकाळच्या वेळी आपली जनावरे घेऊन घरी आले. जनावरे गोठ्यात जाऊ लागली. त्यावेळी धारेरावांनी शिकार करून आणलेली रानकोंबडी हार्या(बांबूपासून बनवलेले कोंबड्या डालण्याचे साधन) खाली डालून ठेवली; आणि धारेराव जनावरे दावणीला बांधण्यासाठी गोठ्यात गेले. जनावरे बांधून बाहेर आल्यानंतर शिकार करून आणलेल्या रानकोंबडीची सागोती(चिकन) करण्यासाठी त्यांनी हारा उचकला. तर काय..? त्या वनस्पतीच्या पानांत गुंडाळून आणलेली रानकोंबडी पुन्हा जिवंत झाली होती. धारेरावांना जरा आश्चर्यच वाटले. मग त्यांच्या डोक्यात विचार आला की, या वनस्पतीचाच काहीतरी चमत्कार घडला असावा. क्षणाचाही विलंब न लावता धारेराव आल्या मार्गे पुन्हा जंगलात गेले. त्या ठिकाणी पोहचल्यानंतर धारेरावांनी त्या वनस्पतीच्या काही मुळ्या, पाने आपल्या जवळ असणार्या कापडी बटव्यात घेतल्या व घरी आले. रात्री जेवण झाल्यावर बर्याच उशीराने धारेरावांनी बटव्यातील मुळ्या व पाने बाहेर काढली. त्या मुळ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या व एका खडबडीत दगडावर उगाळून एक ग्लासभर रस तयार करून स्वत:पिऊन घेतला. त्या आणलेल्या पानांतील एक दीड पाने खाल्ली. त्यानंतर धारेराव निवांतपणे झोपी गेले. मध्यरात्रीच्या वेळी झोपेत असतांना एक अद्भूत संवेदना धारेरावांच्या देहाला जाणवली. धारेराव अचानक झोपेतून ताडकण उठले. तेंव्हा त्यांना शरीर व डोके जड झाल्याचे जाणवू लागले. तेंव्हा आपल्या देहात नक्कीच काहीतरी एक दैवी शक्ती संचारल्याची जाणीव झाली.
याच काळात राजूर पंचक्रोशीत आदिवासी समाज्यावर होणार्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी क्रांतिकारी चळवळींना वेग येऊन रौद्ररूप धारण केले होते. राघोजी भांगरे, कोंड्या नवला अशा आदिवासी क्रांतिकारकांनी या चळवळीत उडी घेऊन बंडाची ठिणगी पेटविली होती. त्याच्या पडसादांनी सह्याद्री पूर्णपणे दुमदुमली होती. त्याचवेळी सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या दीनदुबळ्या आदिवासी बांधवांवर होणार्या अन्याय व अत्याचाराचा सूड घेण्यासाठी कुमशेत गावचे सुपुत्र वीर धारेराव हे एक आदिवासी वादळ अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेले शेवटचे गाव कुमशेत, ठाकरवाडी पंचक्रोशीत पेटून उठले होते. आदिवासी गोरगरीबांना धान्य, कपडे, थोडेफार पैसे अशी मदत पुरवत होते. धारेराव ठाणे जिल्ह्यातील सावरणा, बांडशेत, वालिवरे अशा आदिवासी गावातील जनतेला देखील मदत करायचे. अगदी जव्हार, माळशेजच नाही, तर.., भीमाशंकर पर्यंत आपल्या मदतीचा हात जनसामान्यांसाठी पुढे करत होते. धारेरावांचे हे कार्य इंग्रज राजवटीच्या व सावकारशाहीच्या डोळ्यात सलू लागले. धारेरावांच्या मदतकार्याला चाप लावून धारेरावांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ‘पाथरे’ घाटातील पोलिस चौकीत इंग्रज पोलिस तैनात केले होते. परंतु संजीवनीच्या स्वरूपातील वनस्पती सेवन केलेल्या धारेरावांच्या अंगी काहीतरी दैवी शक्ती संचारत असल्याने इंग्रज पोलिसांना धारेरावांना पकडण्यात यश आले नाही.
पोलिस त्यांना पकडायला आल्यानंतर धारेराव १००० फुटाचा कडा(कोकणकडा) सहज उतरून खाली जायचे व पुन्हा सहज वरती चढूण यायचे. वार्यासारखे धावायचे, पळायचे, कधी – कधी कोकणकड्यावरून सहज खाली उडी टाकायचे, तरीही कसलीच जखम, ईजा धारेरावांना होत नव्हती. धारेराव बाबा बहुरूप्या सारखी वेगवेगळी रूपं धारण करायचे. कधी गुराखी… तर कधी मध काढणाराचे रूप घ्यायचे. कधी – कधी वाटसरू होऊन पोलिसांत देखील मिसळायचे. गप्पा मारायचे. त्यांच्यातच राहून पोलिसांच्या हालचालींची टेहळणी करायचे. पोलिस त्यांनाच विचारायचे धार्या दिसला काय कुठे? तेंव्हा हा बहुरूपी धार्याच उत्तर द्यायचा की, तो बंडकरी..? असेल कुठेतरी..?घनदाट जंगलात, कडेकपारी. परंतु बहुरूपी स्वत: धार्या असल्याची भणक देखील कधी इंग्रज पोलिसांना लागू दिली नाही. धार्याला पकडून देणार्या ईसमाला इंग्रज पोलिसांनी ईनाम सुध्दा घोषित केले होते.
इंग्रज सरकारने धार्याला पकडण्यासाठी उचललेलं प्रत्येक पाऊल, प्रत्येक योजना अयशस्वी होत होती. १५-२० दिवस दबा धरून बसलेल्या पोलिसांना धार्या सापडत नव्हता. धार्याला पकडायला इंग्रज पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. त्यामुळे पोलिसही चवताळले होते. रानावनांत दिसणार्या आदिवासींना दम भरत होते. मारझोड करत होते. त्यामुळे धार्या कनवळला होता. अखेर त्याने स्वत: इंग्रज पोलिसांच्या स्वाधीन होऊन शरणागती पत्कारायचे ठरवले होते. एके दिवशी धार्याने पोलिसांची भेट घेऊन आदिवासींवर होणारा अन्याय व अत्याचार थांबविण्याबाबत विनंती केली. आणि म्हणाला की, तुम्ही मला शरण या. मी सुध्दा तुम्हाला शरण येतो. मग तुम्ही मला ज्या ठिकाणी न्याल त्या ठिकाणी मी तुमच्याबरोबर येण्यास तयार आहे. परंतु माझी एक अट आहे, ती म्हणजे माझे फक्त शीर(मुंडके/डोके) कापून न्या. माझे धड मात्र माझ्या जन्मभूमीत राहू द्या. मग मात्र इंग्रज पोलिस तयार झाले. धार्याला पकडून त्याचे शीर कापले गेले. आणि त्वरित पुणे या ठिकाणी सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणी त्या काळात जेलमध्ये इंग्रज जेलर जो कोणी होता, त्याच्या समोर वीर धारेरावांचे शीर ठेवण्यात आले. त्या जेलरने धार्याचे शीर पाहिल्या बरोबर धार्याच्या शीराला व आदिवासी समाज्याला ‘शिवीगाळ’ केल्याचा प्रकार घडला असावा. (असा अंदाज वर्तवला जातो) त्याच क्षणी धार्याचे शीर जिवंत होऊन त्या जेलरच्या नरड्यावर उडून बसले व जोराने चावा घेतला. तसाच जेलर घाबरला व जोरात विव्हळला. आपल्या दोन्ही हातांनी जोराने धार्याच्या शीराला पकडून बाजूला झटकले. तेंव्हा माझ्या या शीराला माझ्या जन्मभूमीत घेऊन चला असे धार्याच्या शीराने इंग्रज पोलिसांना बजावले. धार्याच्या शीराचा असा रौद्र व राक्षसी अवतार पाहून इंग्रज पोलिसही घाबरले होते. त्यामुळे विलंब न लावता पोलिस धार्याचे शीर घेऊन कुमशेतला आले, आणि ज्या ठिकाणी धार्याचे धड पडले होते, त्या ठिकाणी या लढवय्य क्रांतिकारकाचा अंत्यविधी करण्यात आला. अशी आख्यायिका/वीर धारेरावांची कर्मकथा कुमशेत येथील काही वृद्ध जाणकार लोक, सरपंच सय्याजी असवले, सराजी असवले, बुधा बांडे इ. ग्रामस्थ मंडळी सांगतात. इतिहासात कुठेही या वीर धारेरावांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद झाली नाही, म्हणून ही आख्यायिका मागे पडली असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. असा हा गोरगरीबांचा कैवारी धार्या.. आदिवासी जनतेच्या गळ्यातील जणू काही ताईत बनला होता. आदिवासी समाज वीर धारेराव बाबांना देव मानतो, आजही मानत आहे.
काही वर्षानंतर धारेराव बाबांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी धारेराव बाबा आदिवासी जनतेच्या सदैव स्मरणात रहावेत म्हणून कुमशेत गावच्या ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून एक धारेरावांचे समाधीस्थळ म्हणून एक मंदीर बांधले.
स्मशान म्हटलं की, प्रत्येकाच्या मनात अगोदरच एक प्रकारचं भय निर्माण झालेलं असतं. परंतु या धारेराव बाबांचे अंत्यसंस्कार केंद्र/समाधी या आधुनिक युगात अकोले तालुक्यातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र बनले आहे. जणू काही स्वर्गातील इंद्राची बाग ‘नंदनवन’ या कुमशेत व ठाकरवाडी परिसरात अवतरले आहे. अगदी तिनही मौसमात निसर्गाची खरी नवलाई पाहून मन भरून जाते. त्यामुळे पर्यटकांच्या चेहर्यावरील आनंद हा अगदी ओसांडून वाहत असतो. म्हणून दरवर्षी हजारो पर्यटक या निसर्गरम्य परिसरात धारेराव बाबांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. पर्यटकांचे खास आकर्षण म्हणजे वीर धारेरावांचे मंदिर, अहमदनगर व ठाणे जिल्ह्यांची सीमारेषा ठरलेला अवाढव्य असा कोकणकडा, आजोबा पर्वत, नाफ्ता डोंगर, घोडी शेप, जुडी कलाडगड, कोंबडा डोंगर, गवळी देव, घनचक्कर डोंगर, मुडा डोंगर, घोड पाऊल, शिपाई बुडी ओढा आणि पाथर्या घाट अशी विविध नयनरम्य पर्यटनस्थळे व धारेराव बाबांचे गुरू सदोबा महाराज यांचे समाधीस्थळ पर्यटकांचे लक्ष वेधल्या शिवाय राहात नाही.
कळसुबाई व हरिश्चंद्रगड अभयारण्यातील जैवसृष्टीचा खजिना या धारेराव बाबांच्या पावनभूमीत कुमशेत परिसरात आपल्याला पाहावयास मिळतो. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट अरण्य, महाराष्ट्राचे मानचिन्ह शेकरू आपल्याला या अरण्यात पाहावयास मिळतो. तसेच वाघ, बिबट, रान डुक्कर, तरस असे अनेक प्रकारचे प्राणी व विविध प्रकारचे पक्ष्यांचे आपल्याला दर्शन घडते. खरी ग्रामीण जीवनशैली कशी असते याची जाणीव आपल्याला होते. रायभोग भाताचे जुने पारंपारिक वाण या गावाने टिकवून ठेवले आहे. आजही काही शेतकरी रायभोग भाताचे पिक घेतात. भोजनात रायभोगाच्या तांदळाचा भात सेवन करतात.
या तीर्थक्षेत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर पुढील परिसरात साधारणतः १०० कि.ग्रॅ. पेक्षा जास्त वजनाचा शेंदूर फासलेला गोलगरगरीत दगड(गोटी) ठेवली आहे. भाविक भक्ताने वीर धारेराव बाबांचे नाव घेऊन एखादी इच्छा मनोमन व्यक्त करायची व ती दगडाची गोटी उचलण्याचा प्रयत्न करायचा, जर त्या भक्ताच्या मनातील ईच्छा/मनोकामना धारेराव बाबांच्या कृपेने पूर्ण होणारी असेल तर ती दगडाची गोटी उचलते. अन्यथा उचलत नाही. अशी एक या दगडाची(गोटीची) आख्यायिका वृद्ध व जाणकार लोक सांगतात.
चैत्र महिन्यामध्ये कुमशेतकर मंडळी संपूर्ण महिनाभर आठवड्याचा एक दिवस असे धारेराव बाबांसाठी पाच रविवार पाळीक दिवस(मोडे) पाळतात. या मोड्याच्या दिवशी शेतात कोणत्याही प्रकारचे कुठलेच काम करत नाहीत.
माझा मित्र श्री.गणेश कवटे(रा. कोळेवाडी – लेंभेवस्ती, ता. संगमनेर) आणि मी…आम्ही दोघेही काॅलेज मित्र निसर्गवेडे असल्यामुळे बर्याच दिवसापासून धारेराव बाबांच्या समाधी स्थळाला जीवनात एकदा तरी भेट द्यावी असे आम्हां दोन मित्रांना सारखे वाटत होते. परंतु दोघेही शिक्षकी पेशाच्या व्यवसायामुळे बाहेर गावी रहात असल्याने ‘येसून ठेवले की, पुसून जाते.’ या म्हणी प्रमाणे आमच्या नियोजनावर पाणी फिरत असे.
जुने धारेराव मंदिर| फोटो : विठ्ठल असावले इच्छा करून गोटी उचलण्याचा प्रयत्न करणारा भक्त. फोटो: महादू चिंधू कोंडार
एकदा नोव्हेंबर – २०२० मध्ये आम्ही ठरवले की, येत्या दिवाळीच्या सुट्टीत धारेराव बाबांच्या समाधी स्थळाला भेट द्यायची म्हणजे.. द्यायचीच.. या माझ्या मित्राचा परिवार आणि माझा परिवार मिळून आम्ही रविवार दिनांक – २२, नोव्हेंबर – २०२० रोजी कुमशेत येथील धारेराव बाबांच्या समाधी स्थळाला भेट दिली. याच दिवशी माझा दुसरा मित्र श्री. बाळू भांगरे(रा. खडकी-बु।।) यांच्या भेटीचाही योगायोग त्या समाधीस्थळी घडून आला. दर्शन घेतले आणि निसर्गाची मुक्तहस्त उधळण …तसेच पृथ्वीवरील स्वर्ग नक्की काय असतो, याची अनुभूती ‘याची देही । याची डोळा ।’ अनुभवली. कुमशेत येथील धारेराव बाबांचे समाधीस्थळ म्हणजे जणूकाही निसर्ग सौंदर्याचे माहेरघर असल्याचे पाहूण आमचे आणि तिन्हीं परिवारांच्या आमच्या अर्धांगीणी व लेकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्या ठिकाणाहून आम्हाला घरी निघावसं वाटत नव्हतं. परंतु सायंकाळ होण्याची वेळ झाली आणि आम्ही जड पावलांनी घरी परतलो.
स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी चळवळी व बंडात उडी घेऊन आदिवासी समाज्याचे दुःखाश्रू पुसणार्या, स्वतः चे शीर(मुंडके) वैर्याच्या हाती कापून देणार्या वीर धारेराव बाबांनी इतिहास घडवूनही या आदिवासी क्रांतिकारकाची नोंद इतिहासात झाली नाही. तरी कुमशेत ग्रामस्थांना, सह्याद्रीतील माझ्या आदिवासी बांधवांना व पर्यटक म्हणून मनमुराद निसर्गाचा आनंद लुटणार्या पर्यटक मित्रांना एकच विनंती की, पर्यटनस्थळाच्या माध्यमातून वीर धारेरावांचा इतिहास जिवंत करून बाबांच्या कार्यकर्तृत्वाची ख्याती जगभर पसरविण्यासाठी आपले सहकार्य निश्चितच बहुमोलाचे राहिल्याशिवाय राहणार नाही.
।। जय आदिवासी ।।