रान तंबाटे
लेखक – बाळू निवृत्ती भांगरे
Read the translated story in English
निसर्गात अनेक वनस्पतींचा खजिना दडलेला आहे. काही वनस्पती आपल्याला फळे-फुले देतात, काही वनस्पती कंदमुळे देतात, काही औषधात उपयोगी येतात, काही सुगंध देतात, काही छाया देतात तर काही आनंद देतात. हा रान वानवळा निसर्ग आपल्याला अगदी मोफत देतो. आज आपण अशाच एका रानवानवळ्याची कथा पाहणार आहोत तो रान वानवळा म्हणजे ‘रान तंबाटे’.
रान तंबाटे हे जंगली पिकांच्या जंगली वाणांपैकी एक महत्त्वाचे वाण आहे. ज्याला ग्रामीण भाषेत रान तंबाटे म्हणतात. रान तंबाटे म्हणजे बाजारात मिळणाऱ्या टोमॅटोचे छोटे रूप. रान तंबाट्यांचा आकार बाजारात मिळणाऱ्या टोमॅटो पेक्षा बराच छोटा असतो. बाजारातील टोमॅटो कमी पैशात जास्त प्रमाणात आणि सहज मिळतो. रान तंबाटे हे नैसर्गिकरित्या रानात वाढते त्यामुळे याला रान तंबाट किंवा जंगली टोमॅटो म्हणतात.
आढळ : ही वनस्पती मुख्य करून गावानजीकच्या परिसरात, पडीक जागेत आढळते. क्वचित प्रसंगी जंगलात, शेतात आढळते. अलीकडे काही लोक या वनस्पतीस परसबागेत लावतात. रान तंबाटे जगभरात किंवा भारतात इतर भागात मिळतात की नाही ते मला माहित नाही. परंतु महाराष्ट्रात अनेक भागात मिळतात.
वर्णन : ही वनस्पती वेलवर्गीय असून जमिनीवर पसरते. काही ठिकाणी ही वनस्पती दुसऱ्या वनस्पतीच्या आधाराने वाढते. वेलाची लांबी साधारण १२ ते १५ फूट असते. चांगली जमीन व पाणी उपलब्ध असल्यास वेल चांगला पसरतो. खोडाचा घेर ४ ते ६ सेमी पेक्षा जास्त असतो. मुख्य वेलाचा घेर साधारण ३-४ सेमी पर्यंत असतो. फांद्या १ ते १.५ फुटापर्यंत लांब असतात. पानांचा रंग हिरवा असून ती साधारण बारीक चिंचोळी असतात. त्यांची लांबी ३ सेमी पर्यंत असते. पानाचा मधला फुगीर भाग २ सेमी पर्यंत असतो. पानांच्या मागील बाजूस पांढरे बारीक लोम (लहान केस) असतात. लहान पिवळसर आकाराची फुले येतात. वनस्पतीस हिरव्या रंगाची बारीक गोलाकार फळे येतात. पिकल्यानंतर फळे लालसर होतात. फळात बाजारी टोमॅटो प्रमाणे बारीक पिवळसर बिया असतात. नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये फळे पिकण्यास सुरुवात होते. फळे काढताना वनस्पतीचा थोडाफार हिरवट रंग हाताला लागतो.
उपयोग : या वनस्पतीची फळे मुख्य करून खाण्यासाठी उपयुक्त असतात. फळांची अगदी चव बाजारात मिळणाऱ्या टोमॅटो सारखीच असते. लहान मुले मोठ्या आवडीने ही फळे खातात. फळांना मीठ लावून खाल्ल्यास अधिक चविष्ट लागतात. लहान मुले फळांचा रस काढून त्यात साखर टाकून ज्यूस करून पितात.
काही वैद्य लोक औषधांत फळांचा उपयोग करतात. आजारपणात माणसाला खाण्याची इच्छा होत नाही किंवा तोंडाला चव नसते. अशावेळी रान तंबाटे मीठ लावून खाल्ले की तोंडाला चव येते. पिकलेले रान तंबाटे खाल्ल्याने तोंडाचा दुर्गंध दूर होतो. आजारपणात ताप आलेला असतांना पिकलेल्या रान तांबत्यांचा रस प्यायल्याने तहान कमी होते आणि ताप उतरण्यास मदत होते. रान तंबाटे पचनास मदत करतात व भूक वाढवतात.
लहान मुले खेळात या वनस्पतीच्या फळांचा वापर करतात. हिरव्या फळांचा गोट्या म्हणून वापर करतात. पिकलेली फळे मौज-मस्तीत एकमेकांच्या कपड्यांना चोळतात. दहा-पंधरा वर्षांपूर्वी लहान मुले दुकान-दुकान खेळ खेळताना फळे विक्रीसाठी वापरत. निर्गुडीच्या पानांचे खोटे खोटे पैसे वापरून फळांची खरेदी-विक्री करत असत. आज हा खेळ दुर्लक्षित झाला आहे. माझ्या कुटुंबात एक लहानसा मुलगा आहे. तो रान तंबाट्यांबरोबर खेळतो. मी त्याला खेळामध्ये सोबत देतो. मी त्याला आमच्या वनभोजनाच्या पिकनिक बद्दल काहीही सांगितलेले नाही. पण माझे बालमित्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा आम्ही लहानपणीच्या आठवणी जरूर काढतो. गावातील लहान मुले अजूनही रान तंबाट्यांचा खेळामध्ये वापर करतात.
माझ्या गावाचे नाव खडकी बुद्रुक आहे. गावातील बुजुर्गांच्या मते हे गाव खडकाळ भागात असल्याने त्याचे नाव खडकी ठेवले गेले. बुद्रुक म्हणजे सगळ्यात पहिले स्थित असलेले. काही लोक त्याला गावठाण असे ही म्हणतात ज्याचा अर्थ सुद्धा मूळ गाव असा आहे.
मी सातव्या-आठव्या इयत्तेत असताना माझे मित्र मारुती, तानाजी, काळू आम्ही दिवाळीच्या सुट्टीत मुळा नदीवर वनभोजनाचा बेत करीत असू तेव्हा खिचडी भातात या रान तंबाटांचा वापर करत असू. त्या वयात आम्हांला तांदूळ, डाळ, मीठ, मिरची. मसाला अगदी सहजासहजी उपलब्ध होत असे मात्र त्यात टाकण्यासाठी बटाटे, वांगी मिळणे मुश्किल व्हायचे. अशा वेळी आम्ही प्रत्येक जण ओंजळ ओंजळभर तंबाटे तोडून खिचडी भातात टाकायला घेऊन जात असे. नदीवर गेल्यावर प्रत्येकजण जबाबदारीने आपआपले काम करत असे. कोणी चूल तयार करून पेटवणे, कोणी सरपण गोळा करणे, तंबाटे कापणे इ. एकदा का खिचडी भात शिजवून तयार झाला की आम्ही मनोसोक्त नदीत अंघोळ करायचो. अंघोळ झाल्यावर आमच्या पैकी एक जण साद्ड्याची (एका वनस्पतीचे नाव) किंवा चांद्याची पाने तोडून ती धुवून स्वच्छ करत असे. मग आम्ही पत्रावळी तयार करून त्यावर खिचडी भात वाढून घेऊन खात असे. खिचडी भातात आवश्यक ती तंबाटे टाकून राहिलेली तंबाटे आम्ही तोंडी लावायला घेत असे. या तंबाटामुळे खिचडी भाताला चांगली चव येत असे. नदीत पोहून दमल्यावर आम्ही पोटभर जेवण करायचो. अशा वनभोजनाचा बेत आमचा चार-आठ दिवसांनी ठरलेला असायचा. मात्र आता मी कामासाठी माझ्या गावापासून दूर आल्याने ते शक्य होत नाही.
A wild variety on the decline. Photos: Balu Bhangre
आमच्या गावचा रान्या बा (बाबा) १९७२ च्या दुष्काळाची आठवण सांगताना म्हणायचा, “गरिबीमुळे बाजारहाट व्हायचा नाही. हाताला काम नाही की कुठे मजुरी नाही. रानावनात मिळल तो भाजीपाला खायाला लागायचा. तेव्हा मी रान तंबाटाची नुसती भाजी मीठ, मिरची टाकून ३ दिवस खाल्ली होती. आताची पोर खाणार नाहीत.” हे सांगताना त्याचे डोळे पाणवायचे. नंतरच्या काळात त्याला वाटेल तेव्हा तो आवर्जून वर्षाकाठी एकदा तरी रान तंबाटाची सुकी भाजी करून भाकरी सोबत खायचा.
दक्षता : गावातील बुजुर्ग व जाणकारांच्या म्हणण्यानुसार या वनस्पतीची फळे अनाशापोटी खाऊ नयेत व अधिक प्रमाणात खाऊ नयेत. त्याने पोटदुखीचा त्रास संभवतो. मुतखड्याचा (किडनी स्टोन) त्रास असणाऱ्यांनी शक्यतो फळे खाणे टाळावीत किंवा कमीच खावीत. त्याने किडनीस्टोनचा त्रास संभवतो.
संवर्धन महत्त्वाचे : या वनस्पतीचे प्रमाण अलीकडे कमी होत आहे. गावात आता रान तंबाटे कमी प्रमाणात मिळतात. हे महत्वाचे जंगली वाण असून त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
मला असे वाटते की रान तंबाते एका परिसंस्थेचा भाग आहेत. त्यांवर कदाचित छोटी जनावरे सुद्धा निर्भर असतील. माणसांना सुद्धा औषधाच्या रूपाने रान तंबाते उपयोगी आहेत. आपत्तीच्या वेळी माणसांना ते खाण्यासाठी उपयोगी येऊ शकतात. म्हणून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन महत्त्वाचे आहे.
सध्याच्या नवीन पिढीला या वनस्पती बाबत जास्त माहिती नाहीये. घराच्या आसपासच्या परिसरात वाढल्यास या वनस्पतीला लोक उपटून टाकतात. युवा पिढीने पुढाकार घेऊन जंगली टोमॅटो सारख्या उपयुक्त वनस्पतींची माहिती जन जैवविविधता रजिस्टर मधे लिहिली पाहिजे आणि त्यांबद्दलची जागरूकता वाढवली पाहिजे. त्याबरोबरच त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
Read the translated story in English
One Comment
Mr. Mahadu Kondar
Dear,
My Best Friend Balu,
I read your motivational rural story ‘Raan Tomato.’ It is a very interesting and amaizing story. I like your story theme and traditional knowledge.
congrats Balu…!
Fantastic..!
All the best your next story writing.
I like it….!