Marathi

मेघपुष्प : जीवसृष्टीचा मूळ आधार

लेखक: महादु चिंधु कोंडार

Read this story in English

राम राम मंडळी,पुन्हा एकदा एका नवीन कथेत आपले सहर्ष स्वागत..!

या नवीन कथेतील विषय माझ्या वाचक प्रेमींच्या हृदयाचा छेद… मनाचा भेद… आणि भविष्याचा वेध… घेतल्या शिवाय राहणार नाही.

सह्याद्रीच्या डोंगर कुशीत वसलेलं पुरूषवाडी हे एक अगदी लहानसं आदिवासी खेडे गाव. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जोडधंदा म्हणून काही लोक पशूपालन करतात.

कुरकुंडी नदी – पुरुषवाडी ची जीवनरेखा. फोटो: महादू चिंधु कोंडार

पूर्वीच्या काळी (साधारणत: सन-२०००पूर्वी)  या गावातील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर, वेदनामय आणि डोळ्यात पाणी येण्याजोग होता. हिवाळा आणि ऊन्हाळा या दोन मौसमात तर शेती सुद्धा कोरडी ठणठणीत आणि आकाशाकडे एकटक नजर लावून बघायची. ऊन्हाळ्यामध्ये तर या शेतीने हिरवा शालू कधी पांघरलाच नाही. भर पावसाळ्यातही कधी-कधी पावसाने दडी मारली तर, शेतात पेरलेलं बीज आणि थोडसं बोटभर उगवलेली रोपं उन्हाच्या झळांनी करपून जायची.

उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात गावातली जमीन कोरडी पडायची. फोटो: महादू चिंधु कोंडार

उन्हाळ्यात गावातील लोक ज्याच्या त्याच्या सोईने १०-१२ लोकांचा गट तयार करून कुरकुंडी नदीच्या काठी वाळू-दगडात एखादा पाणवठा श्रमदानाच्या माध्यमातून खोदायचे, आणि मग त्या पाणवठ्यातून त्या त्या गट केलेल्या कुटुंबातील महिला व लहान-लहान पोरं डोक्यावर हंडा, कळशी घेऊन दिवसभरात २-३ वेळा पाण्यासाठी भटकंती करत असत. दरड व घाटमाथ्यावरून चढण-उतरण करून त्यांची दमछाक होत असे. कधीकधी महिन्यातून १-२ वेळा दर्‍यातील सार्वजनिक विहिरीवर टँकर पाणी घेऊन यायचा. टँकर आला की, बायका, पोरांची पाण्यासाठी झुंबड उडायची. हे सर्व सहन करून महिलांचा जीव अगदी मेटाकुटीला आला होता. या सर्व प्रक्रियेला माझे कुटुंबही अपवाद नव्हते.

त्या काळामध्ये नदीवर धरणे, सिमेंट बंधारे असे काही नव्हते. जनावरांना पाणी पाजायला पाणवठ्यावर नेण्यासाठी तासनतास लागायचे. गुराख्याच्या पायात चप्पला नसायच्या. ऊन्हाच्या कडाख्याने तापलेल्या मातीतून चालतांना तळपावलांची लाहीलाही व्हायची. जीव अगदी रडकुंडीला येऊन आईचे दूध आठवायचे.

नदीवर धरण नसल्याने जनावरांना पाणी पिण्यास न्यायला तासनतास लागायचे. फोटो: महादू चिंधु कोंडार

एक दिवस गावातील आत्माराम नावाचा तरूण खेकडे पकडण्यासाठी नदीवर गेला होता. या कुरकुंडी नदीकाठी ‘जितवना’ या ठिकाणच्या परिसरात खडकाच्या कपारी त्याला एक खेकडा दिसला. तो खेकडा ज्या छिद्राच्या तोंडाशी बसला होता, त्या छिद्रातून पाण्याचा एक जीवंत झरा वाहत होता. त्या तरूणाने तो खेकडा पकडण्याचा बराच प्रयत्न केला, पण खेकडा त्या छिद्रामध्ये लपून बसायचा. अखेर त्या तरूणाने आपल्या जवळ असणार्‍या लोखंडी सळईने त्या खेकड्याची वसाहत फोडायला सुरूवात केली. तो तरूण जसजसे खडक फोडून वसाहत उकरत होता, तसतसे जास्तीचे पाणी त्या छिद्रातून बाहेर वाहू लागले होते. शेवटी त्याने वसाहत फोडून कसाबसा तो खेकडा पकडला, पण छिद्रावाटे बाहेर वाहू लागलेले पाणी बंद होत नव्हते. याचे जरा आश्चर्यच त्या तरूणाला वाटले. सायंकाळी तो तरूण घरी आला. रात्री मित्रांच्या गप्पागोष्टींत त्याने या जीवंत झर्‍याचे गूढ मित्रांना सांगितले.

मग दुसर्‍या दिवशी सर्व मित्रमंडळी त्या ठिकाणी जाऊन एक पाणवठा तयार केला. या पाणवठ्यातील पाणी स्वच्छ, निर्मळ व गोड होते. बरेच दिवस गावातील लोक या पाण्याचा पिण्यासाठी वापर करू लागले. काही वर्षानंतर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विहीर व पाईपलाईन मंजूर झाली. परंतु विहीर नेमकी कुठे खोदायची? कोठे पाणी असेल? गावाला बारमाही पुरेल एवढे पाणी विहीरीला लागेल का? अशा अनेक प्रश्नांवर या गावबैठकीत चर्चा झाली. यावेळी लोकांची वेगवेगळी मतं आली. परंतु आत्मारामने ‘जितवन्यात विहीरीचे खोदकाम करा’ हे स्वत:च्या अनुभवाच्या जोरावर गावबैठकीत सांगितले. यावर सर्व जनतेचे एकमत झाले व त्याच ठिकाणी विहिरीचे बांधकाम करून गावात पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली व पाईपलाईन केली. जी आजही टिकून आहे. अशा पध्दतीने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जरी सुटला असला, तरी शेतीसाठी पाणी, पाळीव जनावरे व जंगली पशू-पक्षी यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित होताच.

विहिरीचे बांधकाम करून पाईपलाईन केली गेली ज्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. फोटो: महादू चिंधु कोंडार

 साधारणत: सन-२००५ मध्ये गावकर्‍यांनी एकत्र येऊन एक ग्रामसभा घेतली. ठराव करून ‘वाॅटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट-वाॅटर(WOTR)’ या सेवाभावी संस्थेला गावात पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यासाठी निवेदन दिले. संस्थेने काही बाबतीत लोकसहभाग व श्रमदान करावे लागेल या अटीवर पुरूषवाडी गावात ‘इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र’ विकास कार्यक्रम साधारणत: सन-२००६ मध्ये सुरू केला. या प्रकल्पात माझ्या मित्रांना ५ वर्ष पाणलोट सेवकाचे काम मिळून रोजगार मिळाला. या प्रकल्पात गावातील एकूण ३७४ हे. क्षेत्रावर मृदा व जलसंधारणाची विविध कामे उदा. सलग समपातळी चर(CCT), जलशोषक चर(WAT), दगडी कट्टे(Loose Boulder Structure), जाळी बंधारे(Gabion Structure), शेती बांध(Farm Bund), Repair Of Farm Bund(RFB), नाला बंडींग, बांध-बंदिस्ती, सिमेंट बंधारे, शेतीबांध व रानमाळावर वृक्ष लागवड करून चराई बंदी व कुर्‍हाड बंदी करण्यात आली.

सलग समपातळी चर(CCT). फोटो: महादू चिंधु कोंडार
जाळी बंधारे(Gabion Structure). फोटो: महादू चिंधु कोंडार

शेतकर्‍यांचे गट तयार केले व पाईपलाईन करून शेतीसाठी पाणी आणले. अशा अथांग प्रयत्नाचे फलित म्हणून पुरूषवाडी परिसरातील शेतीने भर ऊन्हाळ्यातही हिरवा शालू पांघरला. या प्रकल्पामुळे माती अडवून जमीनीत पाणी जिरवता आल्याने विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली. शेतजमीनीत ओलावा टिकून राहिल्याने शेतपीकांचे नुकसान टळले. लोकांना व माझ्या कुटुंबाला गावातच मृदा व जलसंधारणाचे काम मिळाल्याने रोजगारासाठीचे स्थलांतर थांबले. या कामांच्या पैशातून माझे शिक्षणही सुरू राहिले, कुटुंबाचे पालन-पोषण झाले. 

 इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र हा प्रकल्प समाप्त झाला तरी तरूणांची, महिलांची रोजगाराची समस्या कायमस्वरूपी सुटावी म्हणून पुन्हा संस्थेने ‘Eco-Tourism Project’ ची मुहूर्तमेढ रोवली. ती आजूनही Grassroutes संस्था चालविते. या प्रकल्पातही तरूणांना Guide, Housekeeper चे काम मिळून रोजगार मिळतो. महिलांंना Cooking चे काम करून दोन पैसे आपल्या कुटुंबासाठी घरी राहून सुद्धा कमविता येतात. या प्रकल्पाने आम्हाला खूप काही शिकवलं, घडवलं; जसे की, नैतिकतेचे शिक्षण घडले, हिंदी भाषा बोलण्यास शिकवलं, अल्प प्रमाणात English भाषा समजू लागली बोलता येऊ लागली. स्वच्छतेची सवय लागली. आम्ही आमच्या ग्रामीण संस्कृतीची जोपासना करून प्रसार करू शकलो.

त्यानंतर संस्थेने ‘वातावरण बदल व अनुकूलन  कार्यक्रम'(Climate Change Adaptaion Programme) प्रकल्प NABARD बँकेच्या   अर्थसहाय्याने सन-२००९मध्ये पुरूषवाडी, शिसवद, खडकी अशा एकूण ९ गावांमध्ये सुरू केला. पुरूषवाडीतील C.C.A प्रकल्पाच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी भैरवनाथ ग्रामविकास समितीची स्थापना करण्यात आली. या प्रकल्पात पाणी व्यवस्थापन, जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, महिला व बालविकास अशा अनेक प्रकारच्या एकूण १४ घटकांवर प्रकल्पाचे काम सुरू होते. तेंव्हा मी माझे D.Ed चे शिक्षण पूर्ण करून शासकीय माध्य.आश्रम शाळा शिरपुंजे येथे रोजंदारी तत्वावर शिक्षक म्हणून काम करीत होतो. त्यावेळी मला एका दिवसासाठी ९० रु. रोजंदारी मिळायची. त्यासाठी दररोज ये-जा करून २४ कि.मी.लांबीचा जंगलातून पायी प्रवास करावा लागत असे. शिक्षण घेऊन नोकरी मिळत नसल्याने घरी राहण्यापेक्षा ज्ञानदानाच्या कार्यातून कुटुंबासाठी दोन पैसे कमवलेले बरे म्हणून मी एवढी पायपीठ करत असे. असे करता करता एक वर्ष सरले. इतक्या कमी पगारात एवढी लांब पायपीट करायची, शिवाय परमनंट होण्याचेही काहीच चिन्ह दिसेना, म्हणून मी कंटाळलो होतो. दुसरा जाॅब शोधण्याच्या विचारात होतो.  माझा गावकरी बंधू देवराम कोंडार हे C.C.A प्रकल्पात Project Incharge म्हणून काम पाहात होते. एके दिवशी त्यांनी माझी भेट घेऊन या C.C.A प्रकल्पा बद्दल माहिती दिली, आणि या प्रकल्पात माझ्या सोबत गावपातळीवर काम करण्याची तयारी आहे का? अशी विचारणा केली. पण मला काम जमेल की नाही या शंकेने मी त्याला उत्तर देऊ शकलो नाही. मी ४-५ दिवस विचारच करू लागलो. त्यावेळी ‘तेल ही गेलं, नी तुप ही गेलं तर’…आणि ‘धरलं तर चावतयं, सोडलं तर पळतयं’ यांसारखी माझी अवस्था झाली होती. मग मी मनात विचार केला की, काहीतरी नवीन शिकायला तरी मिळेल. नाहीतर अनुभव तरी येईल. मग मी C.C.A प्रकल्पात काम करण्याचे ठरवले. मग बंधू देवरामला मी काम करण्यास तयार असल्याचे सांगितले. अशा पद्धतीनं मी या C.C.A प्रकल्पाशी जोडला गेलो. ‘वसुंधरा सेवक’ म्हणून मी या प्रकल्पात स्वत:च्या गावात काम पाहात होतो.

जलसंधारणासाठी तयार केलेले कुंड. फोटो: महादू चिंधु कोंडार

‘इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम’ या प्रकल्पाने लोकांना पाणी अडवायला व पाणी जिरवायला शिकवलं. त्यानंतर C.C.A प्रकल्पात लोकांना पाण्याचे महत्व, मूल्य समजावे, शेती, जनावरे, उद्योगधंदे, पशू-पक्षी यांच्यासाठी पाणी वाटपाचे नियोजन, पाण्याचा ताळेबंद पध्दतीने व काटकसरीने वापर करायला लोकांना शिकवायचे होते. या प्रकल्पात मी पाणी व्यवस्थापन, जैवविविधता संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षणे घेऊन त्यातून मिळणार्‍या ज्ञानाचा वापर मी माझ्या गावच्या विकास कार्यात करत होतो. CCA project अंतर्गत पाणी संवर्धनासाठी शेतकर्‍यांना खडकातील शेततळे खोदून देण्यात आले. त्यांचा वापर आजही शेतीसाठी व जनावरांसाठी केला जातो. गावात होणार्‍या ग्रामसभा, वार्ड बैठका, ग्रामविकास समिती, संयुक्त महिला समितीच्या बैठका यांमध्ये मी पाण्याचे महत्व व पाण्याचा ताळेबंद, पाणी वाचविण्यासाठीच्या टिप्स अगदी पटवून सांगत असे की, मित्रांनो आपण पाणी बचतीसाठी हे करू शकतो…गरजेपुरतेच पाणी वापरूया…आजही आपल्या गावात नळांना तोट्या नाहीत, यातून लाखो लीटर पाणी वाया जाते. प्रथम नळांना तोट्या बसवूया…आपली जनावरे व वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा अतिरेकी वापर थांबवूया…आपल्या घरातील शिळे पाणी ओतून देण्याची दैनंदीन प्रथा बंद करूया…टाकीच्या पाण्याचे ओहरफ्लो बंद करूया…पाण्याचे छोटे-छोटे लिकेज बंद करूया…गावातील पिण्याचे पाणी सोडण्याची वेळ कमी करूया…प्रत्येकाच्या नळ कनेक्शनला वाॅटर मीटर बसवूया…पाण्याचे Recycle करूया…सांडपाण्याचा पुनर्रवापर करूया… एका मोठ्या झाडात साधारणत: २लाख लीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते तर एक माणूस.. एक झाड योजना राबवूया…शेतीसाठी ठिबक, तुषार सिंचन पध्दतीचा वापर करूया…पाटाने पाणी देण्याची सवय मोडूया… पिकांना पाणी देण्याच्या वेळेत बदल करूया… शेतीत कमी पाण्यावर येणारी पिके घेण्याचा संकल्प करूया…पैसे कमविण्यासाठी पाणी परवानगी नसतांना भाड्याने मोकाट पाणी देण्याची पध्दत थांबवूया…

वारंवार पाण्याचे महत्व लोकांच्या मनामध्ये बिंबवून लोक सुद्धा मी सांगितलेल्या पध्दतींची अंमलबजावणी करत होते. सांडपाण्याचा पुनर्रवापर परसबागेला, वृक्षांसाठी करत होते, आजही करीत आहेत.

 C.C.A प्रकल्पा अंतर्गत पुरूषवाडी गाव परिसरातील जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन व्हावे म्हणून वसुंधरा जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणा खाली लोकसहभागातून ‘जैवविविधता नोंदवही’ (PBR – People’s Biodiversity Register) तयार केली. यामध्ये पुरूषवाडी गावच्या परिसरातील सर्वच जैविक विविधतेच्या नोंदी ठेवण्यात आलेल्या आहेत. यातील वन्य जैवविविधता या घटकासाठी ठोस पावले उचलून त्यांचे रक्षण व संवर्धन व्हावे, वन्य पशू-पक्षांना पाणी मिळावे म्हणून प्रकल्पाचे काम सुरू असतांना गाव परिसरातील डोंगरमाथ्यावरील नैसर्गीकरित्या उपलब्ध असलेली खडकातील कुंडे(रांजण खळगे)खूप वर्षांपासून मातीने बुजलेली होती. ती स्वत: आम्ही उकरून पुन:र्जीवीत करून त्यामध्ये पावसाचे पाणी साठून वन्य जीवांना, पशू-पक्षांना ते पाणी पिण्यास मिळावे म्हणून प्रकल्पातील इतर काही गावांपेक्षा आगळे वेगळे नाविण्यपूर्ण कार्य केले आहे. सजीवसृष्टी विषयी लोकांच्या मनात आत्मियता, जिव्हाळा, मुक्या प्राण्यांविषयी प्रेम, सहानुभूती निर्माण व्हावी, जीवसृष्टीच मानवाच्या अस्तित्वाचा खराखुरा आधार आहे, म्हणून पुरूषवाडी गावात आम्ही सन-२०१५ मध्ये एक ‘Biodiversity Festival’ घेऊन महाराष्ट्रातील इतर गावांना दिशा देण्याचे कार्य केले आहे.

जंगली पशु पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी माती उकरून तयार केलेले कुंड. फोटो: ग्रासरूट्स

या कथेच्या माध्यमातून तुम्ही पाण्याचे महत्व जाणायला, पुढे जन्म घेणार्‍या आपल्या भावी पिढ्यांसाठी पाण्याचं अस्तित्व टिकून रहावं म्हणून गरजेनुसार वापर करायला व सजीव सृष्टीकडे एक जबाबदार नागरीक म्हणून डोळसपणे बघायला जरी शिकलात, तरी ही कथा एक दिशादर्शक, प्रेरणादर्शक व मार्गदर्शक ठरली असेच मी मानेल.           

धन्यवाद..!

*Cover photo by: Glen Carstens-Peters on Unsplash

Read this story in English

Meet the storyteller

Mahadu Chindhu Kondar
+ posts

Mahadu has completed his BA / D.ED and teaches at the Sangli District Council School. He is a master trainer and senior guide cum facilitator in Purushwadi village. He has been working on a local climate change adaptation watershed project for the past 5 years. He has a keen interest in reading, writing and documenting the old way of life in Purushwadi.

महादू ने अपनी बीए/डी.एड. की पढ़ाई पूरी की है और सांगली जिला परिषद स्कूल में पढ़ाते हैं। वे पुरुश्वाडी गांव में एक मास्टर ट्रेनर और वरिष्ठ गाइड सह सुविधा प्रदाता हैं। वे पिछले 5 वर्षों से एक स्थानीय जलवायु परिवर्तन अनुकूलन जलाशय परियोजना पर काम कर रहे हैं। उन्हें पुरुश्वाडी में पुराने जीवन के तरीके को पढ़ने, लिखने और दस्तावेज़ करने में गहरी रुचि है।

Grassroutes Journeys
Website | + posts

Grassroutes Journeys is a national award winning social enterprise that aims to develop sustainable livelihoods in rural India through community-centered tourism enterprises – owned, managed and run by local communities. It is working across 17 financially sustainable village tourism centers in 4 states – Maharashtra, Madhya Pradesh, Andhra Pradesh and Gujarat. Its rural tourism model has created over 15,000 days of employment annually, impacted about 700 households with alternate source of livelihoods, and helped in reverse migration and conservation of biodiversity.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x