Marathi

मासे पकडण्याच्या साधनांच्या आठवणी

 लेखक – बाळू निवृत्ती भांगरे

Read the translated story in English

बालपण एक निसर्गानं मानवाला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. या वयात अनेक गोष्टीचं कुतूहल, जिज्ञासा असते. मला माझ्या बालवयात मासे पकडण्याच्या साधनांपासून ते मासे पकडण्यापर्यंत अशा अनेक गोष्टीचं कुतूहल वाटायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या गावातील चिंध्या बा (चिंधू बाबा) जवळ मी तासनतास बसून तो तयार करत असलेली विविध मासेमारीची साधने बघत बसायचो. ही साधने कधी आडवी- उभी करून तर कधी त्याची विणकामे मी ओढून पाहत असे. एकदा तर त्यांनी विणायला घेतलेले मासे पकडण्याचे फेक जाळे त्याच्या अनुपस्थित मी गुंतवून टाकले होते. माझ्या या कृत्यामुळे तो माझ्यावर प्रचंड चिडला होता. बांबूची काठी घेऊन मागे लागला होता. मग मी घाबरून माझ्या मित्राच्या घरी जाऊन लपलो होतो. इतकं सगळं होऊन तरी सुध्दा मला त्या साधनांचं मोठं आकर्षण वाटत असे.

खडकी बुद्रुकमध्ये वापरली जाणारी मासेमारीची साधने. फोटो: बाळू निवृत्ती भांगरे

मी पुन्हा चिंध्या बाला त्या घटनेचा विसर पडल्यावर त्याच्याकडे लाडी-गोडी लावत गेलो होतो. नंतर चिंध्या बाला मी त्याच्या विविध बारीक- सारीक कामात मदत करू लागलो. त्यात त्याच्या हातात बांबूच्या घोळलेल्या काड्या देणे, जाळं तयार करण्यासाठी धागा तयार करायला मदत करणे, त्याच्या घरून त्याला विविध वस्तू आणून देणे, घरी विविध निरोप पोहच करणे अशा कामात मदत करू लागलो. या दरम्यान चिंध्या बा माझा फारसा राग करायचा नाही. त्याला कदाचित दोन कारणं असावीत एक तर त्याचे नि माझ्या वडिलांचे घरगुती संबंध चांगले होते नि दुसरे मी त्याला त्याच्या विविध कामात मदत करत असे.

त्या वयात मला चिंध्या बा करत असलेल्या साधनांविषयी थोडीफार माहिती झाली होती की ही साधने मासे पकडण्यासाठी वापरतात. मात्र त्या वयात त्यांचा वापर करण्याचा योग कधीच आला नाही. चिंध्या बा केवळ स्वत:साठीच ही साधने तयार करत असे त्यांची विक्री फार क्वचितच करत असे. त्याला मासे पकडण्याचे प्रचंड वेड होते इतके की तो दररोज नित्य नियमाने मासे पकडायला जात असे अगदी उतार वयापर्यंत! चिंध्या बाकडे मासे पकडण्यासाठी खास धाग्यांनी विणलेली गांझवी (मासे ठेवण्यासाठी धाग्यांनी विणून तयार केलेली एक पिशवीच्या आकाराचे साधन) असायची. त्या पिशवीत तो विविध रंगाचे, आकाराचे मासे पकडून आणायचा. या माशांचा आकार, रंग, जिवंत माशांची हालचाल पाहून मला फार नवल वाटायचं. माशांचं पाण्यातील जीवन कसं असेल? मासे कसे पकडत असतील? ते सहजासहजी आपल्या हातात येत असतील का? हातात घेतल्यावर आपल्याला गुदगुल्या होतील का? ते आपल्याला चावतील का? ते काय बरं खात असतील? असं खूप साऱ्या प्रश्नाचं माझ्या मनात काहूर माजायचं.

मी अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांचं ओझं घेऊन माझ्या वडिलांकडे जात असे. त्यातील काही प्रश्नांची उत्तरे मला सहजासहजी वडिलांकडून मिळत. मात्र माझे प्रश्नच इतके असायचे की वडीलपण माझ्यावर कधी कधी चिडायचे ‘’या वयात शाळा बिळा सोडून काय भिकार नाद लागलाय!” म्हणून चिडायचे. त्याला कारणही तसचं होत. आमचं एकत्र कुटुंब असल्याने घरात आईवडील सोडलं तर कोणी मांसाहार करणारा नव्हता. यामुळे मांसाहाराचे नाव जरी काढले तरी घरात हाहाकार माजायचा. मला मासे खाण्याची आवड मात्र नव्हती मात्र ते पकडण्याची तीव्र इच्छा होती. कौटुंबिक दडपणामुळे माझे मासे पकडण्याचे स्वप्न बालवयात अपूर्णच राहिले. त्याकाळात नदीवर एकट्याला जायाला परवानगी नसे. गेलो तर घरच्यांसोबत जायचे आणि परत यायचे. त्यातही खूप सूचना मिळायाच्या इकडे जाऊ नको! हे करू नको! खोल पाण्यात जाऊ नको!

मुळा नदी. फोटो: बाळू निवृत्ती भांगरे

मी माझ्या माध्यमिक शिक्षणाला सुरुवात केली तेव्हा मला बऱ्यापैकी मोकळीक मिळू लागली. अभ्यासाबरोबरच जास्तीत जास्त वेळ मित्रांसोबत राहू लागलो. आमचं एकत्रित कुटुंब आता वेगळं झालं होतं. गावात मारुती माझा अगदी जवळचा मित्र होता. इतका की आमचं जेवण खाणं अगदी एकमेकांच्या घरीच व्हायचं. त्याच्या वडिलांनाही मासे पकडण्याचा नाद होता. पण सारखा नाही. महिन्यातून दिड महिन्यातून एकदा त्याचे वडील समुहाने मासे पकडायला जात असे. असे असले तरी त्याच्या घरी मात्र मासे पकडण्याची सर्वच साधने होती. ती माळ्यावर अगदी व्यवस्थित ठेवलेली असायची. ती त्याच्या घरातून अगदी सहजासहजी दिसायची मात्र ती वापरायला आम्हा मुलांना परवानगी नव्हती. मारुतीचे वडील जेव्हा घरी नसायचे तेव्हा मी ती साधने पाहण्याचा आग्रह करत असायचो. तेव्हा तो पटकन लाकडी वाय आकाराची सीडी लावून तयार ठेवत असे. मग आम्ही दोघे  माळ्यावर चढून ती साधने काढून बघत असे. येथेच मला मासेमारीच्या साधनांची चांगली ओळख, वापराची पध्दत, कोणते साधन कधी आणि कसे वापरायचे? याची चांगली माहिती झाली.

मारुतीला त्याच्या घरी साधने असल्याने या साधनांची चांगली माहिती होती. बऱ्याचदा तो हट्ट धरून त्याच्या वडिलांच्या मागे लागून मासे पकडायला जात असे. मासे पकडण्याची तिवरी, जाळे, फेकजाळे, तोंडया, माशांची मळई, खेकडांची मळई, भोताड, गळ ही साधने व त्याला जोडायची जोडसाधने मला याच वयात अधिक समजली. या काळात मला नेहमी वाटायचं की आता तरी आपण मासे पकडला जावे, खोल डोहातून खूप सारे मासे पकडावेत पण साधनांअभावी मी काही करू शकत नव्हतो. मारुतीचे वडील पण सहजासहजी साधने वापरायला देतील असे वाटत नव्हते. ते कदाचित देतीलही पण त्यांना म्हणायची आमची दोघांचीही हिमत नव्हती. आमच्या दोघांत या विषयावर नेहमी चर्चा विनिमय होत असे मात्र त्यातून समाधान निघत नसे.

एका रविवारी मारुतीने मला चांगली बातमी दिली की, आमच्या घरात एक तुटकी तिवरी आहे. माझ्या बा ने तिचे सगळे मणी (पाण्यात बुडणारे लोखंडी नट-बोल्ट, शिसाचे किंवा मातीचे तयार केलेले गोल लांबकोळी आकारचे मणी) काढून घेतले आहेत. ते फेकून देणार होते मात्र मी ती माझ्याकडे गोळा करून ठेवली आहे. या गोष्टीचा मला मनात खूप आंनद झाला. माझे जेवणावरही नीट लक्ष नव्हते मी घाईघाईत जेवण संपवून मारुतीच्या घराकडे वाट काढली. आम्ही ती तिवरी त्याच्या घराच्या बाजूच्या सावलीत नेली. तिची व्यवस्थित पाहणी केल्यावर आम्हांला समजलं की वापरण्या योग्य नाही मग तुटलेली तिवरी दोऱ्याने सांधली, गरज पडेल तिथे आम्ही गाठी बांधल्या त्यात आता फक्त पाण्यात बुडणाऱ्या मण्यांची कमतरता होती. मग आम्ही काळवाट माती आणून त्याचे मणी बनवून सुकायला टाकले. चार-पाच दिवसांनी मणी भाजून तिवरीत ओवायचे नियोजन केले. नियोजना प्रमाणे सगळं झाल्यावर आम्ही रविवारी सुट्टीच्या दिवशी नदीवर जाण्याचा बेत आखला. अखेर तो रविवारचा दिवस उजाडला आणि आम्ही जेवणानंतर नदीवर जाण्याचं ठरवलं.

तिवरीच्या मदतीने मासे चाळताना. फोटो: बाळू निवृत्ती भांगरे

त्या रविवारच्या दिवसात मी कमीत कमी चार-पाच वेळा मारुतीच्या घरी चकरा मारल्या असतील. नदीवर मी मारुती, तानाजी असे आम्ही तिघेजण होते. तिथे गेल्यावर आम्ही तिवरी पाण्यात टाकली. मनोसोक्त पाण्यात अंघोळ केली अन मोठी माणसे बाजूला येऊन बसतात तसे आम्ही बाजूला जाऊन बसून मासे तिवरीत गुंतण्याची वाट पाहू लागलो. बराच वेळ झाल्यानंतर आम्ही तिवरी काढायला सुरुवात केली अन् निराशाच वाट्याला आली. आमच्या तिवरीत एकही मासा चुकुनही गुंतला नव्हता. मी अंघोळ करून मुकाट्याने (शांतपणे) अंग कोरडे करून कपडे घातले आणि मित्रांसोबत शांत, निराश, हतास, उदासपणे घरचा रस्ता धरला. एखादा पराभव झाल्यासारखं दु:ख, शल्य मनाला बोचत होते. मी माझ्या मासे पकडण्याच्या पहिल्याच मोहिमेत हरलो होतो. इतके दिवस ज्या क्षणाची वाट मी पाहत तो क्षणही नियतीने मला अनुभवू दिला नव्हता. घरचा रस्ता धरताना मी सर्वात उदास, नाराज होतो. माझे मित्र माझी खूप समजूत काढत होते, विनोद- चेष्टा करून मला हसविण्याचा, बोलता करण्याचा प्रयत्न करत होते. ते म्हणत होते जिथे आपण तिवरी टाकली तिथे मासेच नव्हते. पण मी जे समजायचो ते समजलो की तिवरी काहीच कामाची नव्हती. घरी गेल्यानंतर मी माझ्या मित्रांना एक दिवस भेटलोच नाही. पुढील काही दिवस मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. स्वत:ला खेळात आणि अभ्यासात गुंतवून दिलं.

जुलै महिना सुरु होता. वळीवाचा पाऊस पडला होता. ओपसा पडल्याने (पाऊस उघडून जमीन कोरडी होणे) शेताच्या पेरण्या सुरु होत्या. कांही दिवसात नदी येणार होती. नदी पाहायला मिळणार म्हणून मी आनंदित होतो. नदीला पाणी आल्यावर गावाकडची लोकं खूप आनंदी असतात. नदीत आलेल्या पहिल्या पाण्यात गडी-बाया माणसे श्रद्धेने अंघोळ करतात. नदीची पूजा करतात. नदी आल्यानंतर काही दिवसात ओढे- नाले वाहायला सुरुवात होते. याच दरम्यान मासे आपली अंडी सोडायला नदीच्या बाहेर पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने येतात. नदी आल्यावर मी पहिल्या पाण्यात नदीवर अंघोळ करून दर्शन घेतले. आधी-मधी पावसाची रिमझिम चालूच होती. भाताची रोपे आता आवणीला (लागवडीस योग्य) आली होती. पुढे काही दिवसातच मुसळधार पावसास सुरुवात झाली नदी, नाले, ओढे तुडूंबभरून वाहू लागले. तशी आम्हांला घरून सूचना मिळायला लागल्या. पावसात फिरू नका, नदीवर जाऊ नका. हो हो म्हणून आम्ही त्या गोष्टींकडे दुलर्क्ष करत असू कारण मुसळधार पाऊस आमच्यासाठी त्या वयात नवीन नव्हते. कुटुंबातील लोक काळजीपोटी आम्हांला त्यापासून असलेल्या धोक्याची जाणीव करून देत होते.

एक दिवस शाळेला सुट्टी असल्याने मी आणि मारुतीने सकाळच्या जेवणानंतर मस्तपैकी पत्यांचा डाव मांडला होता. बराच वेळ खेळून झाल्यावर आम्हांला कंटाळा यायला लागला. आमच्या दोघांच्याही घरी कोणी नसल्याने आम्ही मासे पकडण्याचा बेत आखला. पद्धतशीर नियोजन केलं. हातात खोरा (फावडे), टोप (पातेलं), मळई घेऊन आम्ही ठरलेल्या ठिकाणाच्या दिशने निघालो. बाहेर मुसळधार पाऊस अन् सुसाट वेगाने वारा वाहत होता. वाऱ्याचा वेग खूप होता इतका की आम्हा दोघानांही इकडून- तिकडे दहा- पंधरा फुटाच्या अंतरावर लोटत होता. अशा परस्थितीतही आम्ही निघालो होतो. पांघरायला पोत्याचा घोंगता (पावसाच्या संरक्षणासाठी धान्य साठविण्याच्या पोत्याचा आत दुमडलेला भाग) घेऊन आम्ही चालत होते. घोंगता उपेळून तर केव्हाच गेला होता. आम्ही भिजून ओलेचिंब तर कधीच झालो होतो. अंगात थंडीची धडकी भरली होती. ओठ अन् दात एकमेकांवर आदळून थुडथूड वाजत होते. आम्ही निश्चित केलेलं ठिकाण होतं होळीचा दरा! वाट तीव्र उताराची होती. रस्ताही चिकट होता. मध्येच आम्ही सरकून पडत होतो. आमचे गुढगे आणि कोपरही फुटले होते पण माघारी जाण्याचं दोघांपैकी कोणीही नाव घेत नव्हतो.

चालत चालत आम्ही कसाबसा होळीच्या दऱ्याच्या एका शेताच्या सांडव्यावर पोहचलो. सांडव्यावरून पाणी वेगाने वाहत होतं, त्याला आम्हांला बंद करून चढणीचे मासे पकडायचे होते. आम्ही वेगाने कामाला लागलो मोठे दगड, छोटे दगड, गवत, झाडाच्या फांद्या जवळ जे मिळेल ते घेऊन आम्ही पाणी अडविण्याचा प्रयत्न करत होतो. बाजूला असलेली माती आम्ही खोऱ्याने काढून पाणी अडवित होतो. अंगावर असलेला घोंगता कधीच सरकून पडला, त्याचे भानही आम्हाला राहिले नव्हते. शरीर थंडीने कुडकुडत होते. बऱ्याच परिश्रमानंतर आम्हांला पाणी थांबविण्यात यश आलं आणि ज्या क्षणाची, ज्या स्वप्नांची मी कित्येक दिवस, कित्येक वर्ष वाट पाहत होतो. ते स्वप्न समोर होतो. आमच्या दोघांसमोर सांडव्याच्या कोरड्या पडलेल्या भागावर मासेच मासे होते. मारुती ओरडला बघत नको बसू, कामाला लाग नाहीतर आहे तेही जाईल.

आता थांबून उपयोग नव्हता अधाशासारखं आम्ही मासे गोळा करायला सुरुवात केली. हा क्षण माझ्यासाठी नवीन होता. मासे पकडताना हाताला गिळगिळीत लागत होतं. हाताला गुदगुल्या होत होत्या, मळ्या जातीचे सर्वाधिक मासे होते. शिंगाटया जातीचा मासा पकडताना मला भीती वाट्त होती. त्याला मिशा होत्या, ते मासे मारुतीने सहजासहजी पकडले. अगदी तुंबलेले पाणी फुटत नाही तो पर्यंत आम्ही मासे गोळा केले. मातीचा तुंबलेला बांध फुटला आणि आम्ही आमचे काम थांबवले. यातून आम्ही साधारण ५ किलो मासे पकडले असावेत. या नंतर आम्ही खालच्या बांधावर मळई मांडण्याचा बेत आखला बांध तुंबून आम्ही मळई बांधली. अर्धा तास थांबायचं ठरवलं. पण थंडी, पाऊस आणि वाऱ्याने आम्हांला जास्त वेळ थांबू दिले नाही. आम्ही पंधरा- वीस मिनिटांतच मळई काढून घेतली. तरीही त्यात आर्धी मळईभर मासे पकडले होते. आम्ही आमच्या जवळ असलेली साधने गोळी करून परतीची वाट धरली. जाताना मनात जिंकल्याचे खूप मोठं समाधान होत. हातात-खांद्यावर असलेलं ओझं जड असूनही एकदम हलकं वाटत होतं. कारण मी जिंकलो होतो. हा क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आणि आनंददायी होता.

मळई मांडण्याची नदीमधील ठिकाण किंवा जागा. फोटो: बाळू निवृत्ती भांगरे

घरी पोचल्यावर मनावर आनंद आणि तितकच दडपण होतं. आनंद जिंकल्याचा आणि दडपण आता वडील घरी आल्यावर काय म्हणतील? ते मला रागवतील का? मारतील का? का ? चांगलं काम केलं म्हणून शाबासकी देतील? रागवण्याचं कारण होतं. मी मुसळधार पावसात आणि वाऱ्यात मासे पकडायला गेलो होतो. आमच्याकडे ओढ्यांना छोटे- मोठे पूर येतात त्यात वाहून जाण्याची भीती. कदाचित त्यांच्या दृष्टीने तेवढी समज माझ्यात नव्हती. मी मनाचं सांत्वन केलं जे व्हायचं ते होईल! मी माझे भिजलेले कपडे काढून गुपचूप पडवीला वाळायला टाकले आणि सुकलेली कपडे घातले आणि वडील येण्याची वाट पाहू लागलो. मनात प्रचंड भीती होती आता काय होणार? वडिलांचे कपडे बदलणे झाल्यावर ते चुलीजवळ शेकायला बसले. मी हळूच माझ्या वाट्याला आलेले कटोरीभर मासे त्यांच्यापुढे ठेवले. त्यांच्या चेहऱ्यावर मला क्षणभर आनंद दिसला. अरे वा कुठून आणले? कोणी दिले? मी म्हटलं, मिच गेलो होतो! दुसऱ्या क्षणी मला त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसला. बाहेर एवढा पाऊस अन् वारा! नाही दादा मी थोडाच वेळ गेलतो, मारुती सोबत. लय भिजलो नाही दादा. माझा चेहरा थोडा रडकुंडीला आला. वडील म्हटले ठीक आहे. त्यांनी मला प्रमाणे जवळ घेतले आणि समजावून सांगितले. आम्हांला तुमची काळजी वाटते म्हणून. मग वडिलांनी आमच्यासाठी थोडे मासे ठेवून उर्वरित मासे आमच्या आळीत वानवळा म्हणून वाटायला सांगितले. आख्या आळीत मासे वाटले. आळीत मी मासे पकडून आणले म्हणून माझं काही लोकांनी तोंडभरून कौतुक केलं. कारण त्यावयात मी स्वत: मासे पकडून आणील असं कोणाला वाटलं नव्हतं.

मी नवव्या इयत्तेत असतानाची एक गोष्ट आहे. आम्ही माझ्या आजोबांची शेती करत असे. माझे आजोबा  म्हणजे आईचे वडील थकले होते. जास्त कष्टांची कामे त्यांना फारशी झेपत नसत. त्यामुळे माझे आई-वडील त्यांना शेती कामात मदत करत असत. आजोबांच्या शेतात त्यावेळी आम्ही भुईमूग केला होता. त्यामुळे वारंवार तिकडं जाणं- येणं सुरू असायचं. त्यावेळी मला  मे महिन्याची नुकतीच सुट्टी लागली होती. मी नि माझा लहान भाऊ माझ्या आई- वडिलांसोबत तिकडे जाणार होतो. जाताना नदीवर कपडे धुवायचे मग शेतावर जायचे. असं नियोजन होतं.

नदी म्हटली की आमच्यासाठी कमालीचा आंनद असायचा. वाळूची मंदिरे तयार करणे, घरे बनवणे आणि मनोसोक्त पाण्यात पोहणे असा आमचा बेत असायचा. ठरल्याप्रमाणे आम्ही नदीवर पोहचलो. आमच्या अगोदर आमच्या गावचे सुनील व त्याचे आईवडील नदीवर कपडे धुण्यास हजर होते. नदी आमच्या गावापासून फार दूरवर नव्हती. केवळ एक किलोमीटर आणि नदीच्या पलीकडे आजोबांचे  शेत.

सुनील मी आणि माझा लहान भाऊ आम्ही आमचा नेहमीचा बेत सुरू केला. सर्वांचे आईवडील कपडे धुण्यात गप्पागोष्टी करण्यात व्यस्त होते. मातीचे मंदिर बनविण्याचा तेवढ्यात सुनीलने ठरविले की आपण मासे पकडू यात. आम्हांला आश्चर्य वाटले. आपल्याजवळ कुठलेही साधन नाही आणि कसे पकडणार मासे पण सुनील हुशार आणि मासे पकडण्याच्या बाबतीत अनुभवी होता. त्यांनी बरोबर उथळ डोहात मासे बघितले होते. मे महिना असल्याने नदीला पाणी फारच कमी होते. आम्ही सुनीलला तो देईल त्या सूचनेप्रमाणे त्याला मदत करू लागलो.

प्रथम आम्ही चिकण माती व वाळू मिश्रित माती आणून छोटा बांध घालून एका उथळ डोहाचे दोन भाग तयार केले. आमच्या जवळ असलेल्या बादली (घमेला) व टोपाच्या मदतीने आम्ही लहान डोहाचे पाणी उपसून मोठ्या डोहात उपसत होते. पाणी जास्त असल्याने डोहातले पाणी संपत नव्हते. मध्येच लहान, मध्यम  मासे पायाला फिरताना गुतगुल्या करत होते. आम्ही तिघेही फार थकलो होतो. थम खाऊन का होईना पण आम्ही माघार घ्यायला तयार नव्हतो. शेवटी माझ्या  लहान भावाने माघार घेतली आणि गुपचित खडकावर बसला. बिचारा त्याने  त्याच्या वयाच्या मानाने खूप मदत केली होती. आम्ही दोघांनी मात्र माघार घेतली नाही. आमचं काम चालूच होतं हळूहळू पाणी संपत आलं तसं मासे इकडून तिकडं उड्या मारायला लागलं. मासे उडायला लागले तेव्हा माझ्या भावाने आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली. त्याच्या ओरडण्याने आमच्या आईवडिलांचे लक्ष आमच्याकडे वेधले गेले अन ते पोरांची मेहनत वाया जाईल म्हणून आम्हांला मदतीसाठी धावून आले. मग काय, सर्वांनी मिळून सगळा पाण्याचा डोह मोकळा केला तसे मासे उड्या मारायला लागले. सगळे मिळून मासे पकडण्यात दंग झाले. माझा भाऊ सर्वांत आनंदीत होता. मासे पकडताना त्याच्या हातातून मासे निसटून देखील जात होते. हळू हळू का होईना तो मासे पकडण्याचा आनंद घेत होता. त्याची मासे पकडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यासाठी त्याने योगदानही दिलं होतं. बादलीच्या तोंडाबरोबर आम्ही मासे पकडले होते. त्याचे समसमान दोन विभाग करून आम्हीं दोन कुटुंबांनी एकमेकांत वाटून घेतले. मासे पकडण्यात मला हे दुसऱ्यांदा यश आले होते. यात सुनिलचा नक्कीच मोठा वाटा होता. आपली मुलंही मासे पकडू शकतात हे माझ्या वडिलांनी आम्हां दोघां भावांचे त्यावेळी केलेले कौतुक खूप आनंद देऊन गेले. वडील जेव्हा हे दुसऱ्याला सांगायचे माझ्या मुलांनी सहज खेळता खेळता मासे पकडले, तेव्हा अभिमानाने उर भरून यायचा.

पुढे मासे पकडण्याचा खूप वेळा योग आला. मी तिवरी, तोंडया, मळई, भोताड, ताटा मांडून, झोळीने झोळून अशी विविध साधने वापरून मासे पकडले.  केवळ फेक जाळ्याने मी मासे पकडू शकलो नाही. त्याचा वापर करण्याची संधी मला कधी मिळाली नाही. बऱ्याचदा अवघड म्हणून मीही त्याकडे दुर्लक्षही केले. असो मी मासे पकडण्यात फार तरबेज नव्हतो. मात्र केवळ आनंद व  छंद म्हणून मासे पकडले.  मला मासे खायला मला फार आवडत देखील नाही. मी वर्षातून केवळ दोन-तीन वेळा मासे खाण्याचा आनंद घेतो. गरज किंवा भुकेपोटी मी मासे कधीच पकडले नाहीत. माझी मासे पकडण्याची आवड ही मासे पकडण्याच्या साधनांपासून सुरू झाली. पुढेही माझं या साधनांबद्दलचं आकर्षण आणि वेड कमी झालं नाही. मी मामाच्या घरी देखील मामासोबत तोंडया, तिवरी, मळई अशी साधने वापरली.

फेक जाळ्याने मासे जाळ्याचा मासे पकडण्यासाठी वापर. Koshy Koshy from Faridabad, Haryana, India, CC BY 2.0 via Wikimedia Commons

महाविद्यालयीन शिक्षण सुरू केले तेव्हा मासेमारीची साधने बनविणाऱ्या व्यक्तींना भेटून मी अधिक जाणून घेत असे. गाव मिळून दोन किंवा तीन व्यक्तीकडेच अशी साधने तयार करण्याचे कौशल्य असते. मी मासे पकडणाऱ्या व्यक्तींसोबत फिरल्यावर मला त्यांच्यातील चर्चा आणि कृती यातून समजलं की काही लोक चुकीच्या पद्धतीने मासे पकडत आहेत. त्यात खूप सारे मासे मरत आहेत. त्यांचा पाण्यातच जीव जातोय आणि गरजेपेक्षाही अधिक मासे मारले जाताहेत. यामुळे पारंपरिक मासेमारीचा साधने वापरून केलेली मासेमारी आणि सध्याची मासेमारीचा पध्द्त यातला फरक ओळखला. त्यातून माझ्या लक्षात आलं की ही साधने वाचवणे आणि त्याबद्दल जागृती करणे गरजेचे आहे.

सन २००९ पासून मी जैवविविधता व पर्यावरण संबंधित विषयावर काम करायला लागलो तेव्हा या बाबत माहिती गोळा करणे हा माझ्या कामाचा एक भाग होता. त्यात माझ्या पूर्व अनुभवाची मला फारच मदत झाली. आजही मी याबाबत लोकांना जागृत करत आहे. मासेमारीची साधने तयार करणाऱ्या व्यक्तींचं हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत जसंच्या तसं पोहचावं यासाठी मी प्रयत्नशील आहे.

मासे पकडण्याच्या साधनांविषयी अधिक माहिती

१. मासे पकडण्याच्या साधनांची थोडक्यात माहिती

मासे पकडण्याची बहुतेक साधने ही बांबूच्या कळकी या जातीपासून बनवली जातात.

मळई या साधनाचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. एक माशांची मळई व दुसरी खेकडांची मळई. यातील प्रकाराप्रमाणेच मासे व खेकडा पकडण्यासाठी मळईचा वापर केला जातो. मळई आकाराने लहान किंवा मध्यम असते. विशेषतः मोठे मासे व खेकडा पकडण्यासाठी उपयोग करतात.

भोताड आकाराने रुंद कमी लांबीचे असते. बारीक, सुंदर विणकाम असते. खासकरून लहान मु-हा जातीचे मासे पकडण्यासाठी वापरतात. याला जोडसाधन साठ्या वापरतात.

तोंड्या लहान, मध्यम किंवा मोठ्या आकराचे साधन असते. त्याचा वापर पाण्याच्या प्रवाहावरून ठरवितात. विणकामासाठी इतर साधनांच्या तुलनेत मोठ्या काड्या वापरतात. आतील बाजू पूर्ण पोकळ असते. याला जोडसाधन नाड किंवा भोक्सी वापरतात. मध्यम-मोठ्या आकराचे मासे पकडण्यासाठी याचा वापर करतात.   ताटा म्हणजे जेवणासाठी वापरली जाणारी खोलगट ताट किंवा प्लेट. ज्यावर साधे झिरझिरीचे कापड बांधून त्याला छिद्र पाडले जाते. ताटात बेरकड जातीच्या खेकडाचे मांसल तुकडे माशांना आमिष म्हणून ठेवले जाते. लहान मासे पकडण्यासाठी याचा वापरत करतात.

२. या साधनांचा वापर कधी आणि कसा करतात?

मळई हे साधन मासे व खेकडा चढणीच्या वेळी व उतरणीच्या वेळी वापरतात. हे साधन कमी पाण्याच्या प्रवाहात (साधारण घोट्या इतक्या पाण्याच्या प्रवाहात) वापरतात. हे साधन नदी किंवा ओढ्यात पाणी कमी असेल व वाहत असेल तेव्हा कधीही वापरतात. विशेषतः पावसाळा ऋतूत अधिक वापरतात.

भोताड हे साधन देखील मळई प्रमाणे कमी पाण्याच्या प्रवाहात शेताच्या सांडव्यावर मासे उतरणीच्या वेळी वापरतात. पावसाचे पाणी कमी झाल्यावर सप्टेंबर- नोव्हेंबर महिन्या दरम्यान वापरले जाते.  

तोंड्या हे साधन मासे उतरणीत वाहत्या पाण्याच्या प्रवाहात खडान (मोठी-छोटी दगडे, झाडाच्या फांद्या, गवत यांनी पाणी अडविणे) बांधून त्यावर मांडले जाते. साधरण गुढग्याइतक्या वाहत्या पाण्यात नदी किंवा मोठ्या ओढ्यावर खडान धरून मांडतात. हे साधन सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात किंवा पाणी वाहते असेल तोपर्यंत वापरतात. ताटा शेताच्या डोबित (डोब-लहान डोह), ओढ्याच्या लहान कुंडात, डव्ह-हात (नैसर्गिक किंवा मानव निर्मित डोह) मांडतात. पाणी कमी झाल्यावर किंवा पाणी आटायला लागल्यावर डोहात ताटा मांडतात. मासे उतरणीच्या दरम्यानही ताटे मांडतात. विशेषतः सप्टेंबर-डिसेंबर दरम्यान अधिक वापरतात. इतर काळात कमी प्रमाणात वापर असतो.

३. अधिक मासे पकडणे व कमी मासे पकडणे याबाबत माहिती

मासे पकडणे साधनांचा वापर, माशांची उपलब्धता, ऋतू व वेळेवर अवलंबून असते. साधनांच्या आकारानुसार त्यात मासे गुंततात. गावातील लोक विशिष्ट काळ आणि वेळ पाहून ब-याचदा सांयकाळी साधन मांडतात व सकाळी काढतात. त्यात जेवढे मासे साधनात जातील तेवढेच मिळतात. मासे चढणीच्या वेळेस कधी कधी एक तासात मळईभर तर इतर काळात केवळ किलो-दोन किलो मिळतात. कधीकधी अगदी कमीच मासे मिळतात. गावातील लोक एक किंवा दोन वेळचे मासे पुरतील एवढे मासे मिळाले की आपले साधन घेऊन घरी जातात. थोडक्यात गरजे इतके मासे मिळाले की लोक साधने काढून घेतात. योगायोगाने अधिक मासे मिळाले की शेजा-यांना किंवा पाहुण्यांना देतात. यामुळे विनाकारण मासे मारले जात नाही. याउलट काही चुकीच्या पद्धती जसे की, स्फोटके, विषारी पावडर द्रव्ये, भूल पाडणा-या वनस्पतीचा पाला वापरून मासे मारले तर केवळ हातात येतील तेवढेच मासे पकडले जातात. बाकी मासे विषाने किंवा भुलून पाण्यात, दगडाखालील विनाकारण मरून जातात. यात लहान मासेही अधिक प्रमाणात मरतात. त्यामुळे माशांची संख्या कमी होते. गळ या साधनाने एकावेळी एकच मासा पकडला जातो. यासाठी जेवढा वेळ देऊ तेवढे मासे पकडले जातात. साधारण दिवसभरात कमीत कमी एक ते दीड किलो किंवा त्याहून अधिक मासे पकडले जाऊ शकतात.

४. गावात आता वापरत असलेली मासेमारीची साधने

गावातील केवळ ८-१० निवडक लोक मासे पकडतात. तेही आपल्या सवडीनुसार, वेळेनुसार. महिन्यात ४-५ वेळेस मासे पकडणारे लोक २ आहेत. उन्हाळ्यात मोकळ्या वेळेत लोक समुहाने महिन्यातून एकदा किंवा दोनदा मासे पकडतात. गावातील हे लोक आजही तिवरी, जाळं, तोंड्या, मळई, गळ, ताटा ही साधने वापरून मासे पकडतात.

Read the translated story in English

Meet the storyteller

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *