चमकत्या काजव्यांचं रहस्य
Story by: Mahadu Chindhu Kondar
Read the translated story in English
नमस्कार मित्रांनो, माझ्या निसर्ग प्रेमींनो,
२० ते २५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुरूषवाडी परिसरातील सर्वच ठिकाणी लक्षावधी काजवे दर्शन द्यायचे. जून महिना लागला की, हा ‘काजवा महोत्सव’ अंगणात सुरू व्हायचा. मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वी आकाशात काळे ढग जमायचे. त्यावेळी या लहानशा कीटकांचा म्हणजे काजव्यांचा जन्म व्हायचा. काजव्यांच्या या अळीचे अगदी दोन आठवड्यांमध्ये पूर्ण वाढ होऊन सायंकाळी काजव्यांच्या माळा झाडं, झुडपं, डोंगर कपारीच नव्हे तर अंगणात आणि घरात देखील चमकू लागायच्या. तेव्हा या बालपणात कुतूहल जागं व्हायचं की, या छोट्याशा काजव्याला लाईट लागते तरी कशी? आणि याच मौसमात दरवर्षी का दिसतात? इतर महिन्यांत किंवा ऋतूत का दिसत नाहीत? असे अनेक प्रश्न मनात घर करायचे. पण.. काय? बालपण …ते बालपण…हातात टाॅवेल किंवा रुमाल घेऊन अंगणात काजवे चमकतांना दिसले की, हाताने फटका मारून खाली पाडायचे, आणि निकामी काचेच्या बल्ब मध्ये किंवा काचेच्या बाटलीत भरून अंधारात गल्ली-बोळांत लाईट- लाईट करत हुंदडत खेळ खेळायचा. एवढच आमचं लहान मुलांचं काम. या खेळाचा नित्यक्रम तीन-चार आठवडे चालायचा. काजवे आम्हा लहान मुलांच्या अगदी अंगा-खांद्यावर खेळायचे, आणि चिमुरड्यांना खूपच आनंदीत करायचे. या खेळात निष्पाप काजव्यांचा अंत देखील व्हायचा, परंतू लहान वयात या गोष्टीचा खेद कधीच वाटला नाही. पूर्वी पशू-पक्षी, कीटक यांच्यावर आपण दया केली पाहीजे हे सांगणारं देखील कोणी नव्हतं. आपली जैविक विविधता आपली संपत्ती व धन आहे. हे बीज मुलांमध्ये शालेय वयातच रुजविले असते तर आम्हां चिमुरड्यांना ते समजले असते.
सध्याच्या युगात मात्र काजव्यांची संख्या खूपच कमी होत आहे. हे असेच चालू राहिले तर एक दिवस निसर्गाचं काळोखातील सौंदर्य हरवेल. अंगणात येणारे काजवे सध्या फक्त डोंगरदर्यांत, जंगल परिसरातच आढळतात. भविष्यात मात्र या काजव्यांची प्रजातीच नष्ट होते की काय? अशी भीती वाटायला लागली आहे. त्याला कारणेही तशीच आहेत – बेसुमार जंगलतोड, जंगल व गवतांची जाळपोळ, प्रदूषण, हवामान बदल, मृदेची धूप आदी. यामुळे काजव्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. त्यामुळे लाखो-करोडो काजव्यांची अंडी नष्ट होत आहेत. म्हणून जन्म घेण्या अधिच हे काजवे मारले जातात. याला मानव जात मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. कारण स्वार्थासाठी मानवाने निसर्गावर प्रहार केला, कुर्हाड चालवली. नैसर्गीक घटकांची शृंखला, परिसंस्था(Eco-system) व जीवनजाळे(web of life) तोडण्याचे फार वाईट कर्म मानवाने केले आहे. याची फार मोठी किंमत आपणाला भविष्यात मोजावी लागणार आहे.
माझा एक अनुभव सांगतो. मित्रांनो वय वाढलं, शिक्षण वाढलं त्याचबरोबर ज्ञान देखील वाढलं आणि या चमकत्या काजव्यांचं रहस्य जाणून घेण्याची जिज्ञासा वाढायला लागली. तेंव्हा या काजव्यांची माहीती हळूहळू समजू लागली. ‘कोलिओ ऑप्टेरा’ या मुंग्यांच्या कुळातील हे काजवे असल्याची जाणीव झाली. याची लांबी २ ते २.५ सेंमी इतकी असते. यांचा रंग काळसर पिवळा किंवा तांबूस असतो. गोगलगायी सारखे मऊ खाद्य हे काजवे खातात. बेडूक, कोळी, अनेक पक्षी या काजव्यांना खातात. सायंकाळी ते पांढरा, पिवळा, हिरवा, नारंगी, निळा व तांबडा असे रंग ते बाहेर फेकतात. १५ दिवसांच्या कालावधीत नर-मादीचे मीलन होऊन नर मरतात. मग मादी झाडांच्या साली, मातीत अंडी टाकून मृत्यू पावते.
या काजव्यांच्या शरीरात ल्युसिफेरीन नावाचे द्रव्य असते. उडतांना या द्रव्याची हवेतील इतर वायूंशी (उदा. ऑक्सिजन, कार्बन-डायऑक्साईड आदी.) संबंध आल्यास जैव प्रकाशाची निर्मिती होते. हा जैव प्रकाश शीत स्वरूपाचा असतो. असे या काजव्यांचं कुतूहल व गूढ आहे. फक्त १४ ते १५ दिवसांचे अल्पायुष्य असतांना सुद्धा काळोखावर मात करुन जगण्याची जिद्द मात्र सोडत नाहीत. या छोट्याशा कीटकांपासून माणसाला शिकण्यासारखे भरपूर गुण आहेत. अगदी काळोखात सुद्धा माणसाचं व्यक्तिमत्व काजव्या प्रमाणं खुलून दिसावं. हे लहानशे जीव कितीतरी लोकांना आनंद व हर्ष देण्याचे कार्य करतात. अशा या काजवा महोत्सवासाठी पुरूषवाडीत सन-२०१२ पासून जून व जुलै महिन्यात पर्यटकांनी भरपूर गर्दी केलेली असते.
मित्रांनो मला अनुभवायला मिळालेला एक अनुभव सांगतो की, मी गावच्या ग्रामीण पर्यटनात गाईड म्हणून काम करत असतांना सन – २०१६ मध्ये एक सुशिक्षित पर्यटकांचा ग्रुप माझ्याकडे दिला होता. रात्री जेवणासाठी नेमून दिलेल्या घरात मी त्यांना सोडले. नंतर सूचना केली की, मी सुद्धा जेवण करून येतो, तोपर्यंत तुम्ही येथेच थांबावे, मग आपण सारे जण काजवे पाहण्यासाठी जंगलात जाऊ. नंतर मी जेवण करून आल्यावर त्यांची चौकशी केली असता ते पर्यटक जेवण झाल्याबरोबर माझी वाट न पाहता इतर पर्यटकांच्या ग्रुपबरोबर काजवे पाहण्यासाठी निघून गेले होते. नंतर मी ते ज्या परिसरातील जंगलात काजवे पाहण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी अंधारात घोडदौड करत पोहचलो, अन पाहतो तर काय ? त्या पर्यटकांनी एक प्लास्टिकची पाण्याची रिकामी बाॅटल घेऊन त्यामध्ये काजव्यांना पकडून ठेवत होते, आणि आनंदित होत होते. परंतु त्यांचे हे कृत्य मला आवडले नाही. त्यांनी पर्यटन संस्थेच्या नियमांचे उल्लंघन केले होते. अखेर त्यांच्या आनंदात विरजण पाडणे मला भाग पडले. हे दृश्य मी पाहिले, आणि त्यांच्या जवळ जाऊन विनंती केली की, या निष्पाप काजव्यांना तुम्ही बाॅटलमध्ये बंदिस्त करू शकत नाही.
ते पर्यटक मला म्हणाले क्यों भाई? मग मी त्यांना एकच सांगितलं की, यह मेरा Nature है। हमारे गाँव का Nature है। इस Nature में आप की मनमानी नहीं चलेगी। ये जुगनू हमारी संपत्ती हैं। इस जुगनू के मौसम में हर साल हमारा और गाँव के लोगों का पेट चलता है, चूल्हा जलता है। मालूम नही क्या आप लोगों को? यह बात जब गाँव के लोगों को पता चलेगी तो पंचायत बैठेगी सौ सवाल खडे हो जाएंगे, और आप के ग्रुप को इसका भूर्दंड भरना पडेगा। तुम्हाला आनंदच लुटायचा असेल तर शांत बसा आणि आनंद लुटा. परंतु या बंदिस्त काजव्यांना त्या बाॅटलमधून पटकन मुक्त करा. दूसर्या निष्पाप जीवांना बंदिस्त करून आपण स्वत: आनंदित होणं हे तर माझ्या मते पूर्णत: मूर्खपणाचे लक्षण आहे. त्या पर्यटकांना माझे बोलणे रूचले असावे वा टोचले असावे हे मला समजले जरी नसले तरी त्यांनी बाॅटलमध्ये भरलेल्या सर्व काजव्यांना त्वरित मुक्त केले. काही का असेना, मी माझी कल्पना वापरून त्या निष्पाप, निरागस काजव्यांचे जीव वाचवण्यास यशस्वी ठरलो होतो.
निसर्ग बहुरंगी आणि बहुढंगी आहे. या निसर्गाला आपण देव मानले पाहिजे. कारण वेगवेगळ्या ऋतूत विविध रूपांचे दर्शन आपल्याला मिळते. इतक्या सुंदर पध्दतीने प्रत्यक्ष दर्शन देणारी दुसरी जिवंत देवता या सृष्टीवर कदाचित नसावी असेच मला वाटते. अद्भूत सौंदर्याची खाण अन् मातीशी आणि मानवी मनाशी एवढं घट्ट नातं दुसरं कुणाचच नाही. म्हणून सांगावसं वाटतं की, निसर्गातील प्रत्येक सजीवाला आपण आपल्या लेकरा प्रमाणं अगदी तळहातावरच्या फोडाप्रमाणं जपलं पाहीजे. कारण पृथ्वीवर जन्म घेणार्या प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे. तो कोणीही मनुष्य हिरावून घेऊ शकत नाही. एक गोष्ट आपण नेहमी ध्यानातच ठेवली पाहीजे ती म्हणजे ‘पृथ्वीवर आपण भाडोत्री आहोत, मालक नाही’ म्हणून सर्वांसाठी एकच विनंती… पर्यावरण वाचवा..! जीवन वाचवा..! जग वाचवा!
Read the translated story in English