कहांडळ गवत व शिंदीच्या झाडांची किमया
फोटो निबंध: महादु चिंधु कोंडार
Read this story in English
निसर्ग माझा सखा सोबती आहे – असे आपण म्हणतो कारण निसर्गाने सर्वच गोष्टी आपल्याला एकही रुपया न घेता दान केलेल्या आहेत. याची किंमत मात्र अजूनही मानव जातीला कळलेली नाही. नैसर्गिक घटकाचा उपयोग मानवाला नाही असा एकही घटक निसर्गात नाही. प्रत्येक घटकाचा उपयोग मानव जातीशी नाते जोडणारा आहे. आज मी आपणाला दोन महत्त्वपूर्ण नैसर्गिक घटकांची गोष्ट सांगणार आहे की या दोन घटकांना गावात व गाव परिसरात फारसे महत्त्व नव्हते परंतु याच घटकांचा कशा पद्धतीने कलाकुसरीच्या माध्यमातून आपण पोट भरू शकतो, पैसे कमवू शकतो हे गावातील दोन सख्ख्या भावांनी साध्य करून दाखवले आहे. त्यांची नावे आहेत गोरक्ष सावळेराम बारामते व तुकाराम सावळेराम बारामते.
पुरुषवाडी हे ११५ कुटुंबांचे एक छोटेसे आदिवासी गाव आहे. गावाजवळ, कुरकुंडी नदी भैरवनाथ डोंगरावरून खाली वाहते, आणि हे नदीचे पाणी ही गावाची जीवनरेखा आहे जे पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरले जाते.
दर वर्षी पावसाळ्यात लाखोंच्या संख्येने काजवे पुरूषवाडी येथे येतात आणि त्यांना बघायला बरेच पर्यटक येथे येतात.
फोटो: ग्रासरूट्स
आमच्या गाव परिसरात अनेक प्रकारची झाडे व अनेक प्रकारची गवते आहेत की ज्यांचा फारसा उपयोग आजही लोकांना माहीत नाही. मित्रहो, आज मी जी कहाणी सांगणार आहे ती म्हणजे कहांडळ गवताची व शिंदीच्या झाडाची. तर प्रथमतः कहांडळ गवताची कहाणी ऐकू.
फोटो: महादु चिंधु कोंडार
पूर्वीच्या काळापासून हे गवत माळराने, डोंगर उतार, शेतीचे बांध यावर उगवलेले असते. पूर्वीपासून फक्त जनावरांना चारा म्हणून व घरावर छत म्हणून शाकारण्यासाठी एवढे दोनच उपयोग ग्रामस्थांना माहित होते.
फोटो: महादु चिंधु कोंडार
कहांडळ गवत जून महिन्यात उगवते आणि नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात परिपक्व होते. परिपक्व झाल्यास गवताचे पाते वाळते व काड्या पिवळ्या-तांबूस रंगाच्या दिसू लागतात.
फोटो: महादु चिंधु कोंडार
गावामध्ये दिवाळी सण मोठ्या आनंद व हर्षाने साजरा करतात. दिवाळीला पाच दिवस या गवताच्या पहिल्या दिवशी एक व असे क्रमाने पाचव्या दिवशी पाच नागाचा फणा जसा उभारतो तश्या पद्धतीने गावातील मुले विणकाम करून दिवाळी तयार करतात व रात्रीच्या वेळी घरोघरी ओवाळतात व गाणी गातात. एवढेच सर्वसामान्य उपयोग सर्वांना माहित.
फोटो: महादु चिंधु कोंडार
परंतु गोरक्ष आणि तुकारामाने तर कमालच केली. त्यांनी या गवतापासून वेगवेगळ्या पद्धतीची कलाकुसर आपल्या हस्तकौशल्याने लोकांसमोर आणली. जसे की या गवतापासून त्यांनी प्रथमतः टोपी विणली. यातुन त्यांनी कल्पना करून आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर भाकऱ्या ठेवण्यासाठी कुरकुला, पक्षांचे आकार उदाहरणार्थ घुबड, मंदिर, फुलदाणी, इंग्रज टोपी विणून एक नवीन प्रेरणा गावातील लोकांना दिली.
फोटो: महादु चिंधु कोंडार
गवताची एक सुंदर टोपी बनवतांना मी दोन्ही भावांना अगदी जवळून पाहिले आहे. माझ्या मित्राच्या वाढदिवसाला मित्रांना भेट म्हणून भेट देण्यासाठी मीही अशी टोपी बनवू इच्छितो.
परंतु हे खरे आहे की देव प्रत्येकाला कलेची भेट दान करत नाही. हे दोन्ही भाऊ नेहमीच कलात्मक होते आणि त्यांची चित्रकला देखील चांगली होती.
फोटो: महादु चिंधु कोंडार
या वस्तू गवताच्या जरी असल्या तरी टिकाऊपणाचा कालावधी जास्त आहे. मला आठवते की तुकारामने भाकऱ्या ठेवण्यासाठीचा कुरकुला ५ वर्षांपूर्वी विणलेला आहे तो अजून जशाच्या तसा आहे. कारण या वस्तू अचानक हातातून खाली पडल्या तरी तुटत फुटत नाहीत.
फोटो: महादु चिंधु कोंडार
बऱ्याच पर्यटकांनी अशा वस्तू खरेदी सुद्धा केलेल्या आहेत.
यातील एक गोष्ट मला अजून आठवते ती अशी की गोरक्ष ने एकदा बनवलेली बैलगाडी एका पर्यटकाने पाहिल्या बरोबरच आपल्या तंबूमध्ये नेऊन ठेवली आणि सकाळी घरी जायला निघाल्यावर गोरक्षला पैसे दिले. त्या पर्यटकाला ती इतकी आवडली होती की ती दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने माझ्या अगोदर खरेदी करू नये म्हणून त्याने ती स्वतः जवळच ठेवली होती.
फोटो: महादु चिंधु कोंडार
अशा या कवडीमोल कहांडळ गवताची किंमत गावकऱ्यांना गोरक्ष व तुकारामने लक्षात आणून दिली आणि या गवतापासून आपण टिकाऊ गोष्टी बनवू शकतो हे दाखवून दिले.
फोटो: महादु चिंधु कोंडार
आता आपण शिंदीच्या झाडाची कहाणी ऐकू. शिंदीच्या झाडांची पाने काटेरी तीक्ष्ण असतात. शिंदीचे झाड दिसायला नारळाच्या झाडासारखे परंतु थोडे वेगळे असते आणि उंचही असते.
या झाडावर सुगरण पक्षी छानपैकी आपला खोपा बनविते.
पूर्वीच्या वेळी आजूबाजूच्या गावाचे लोक या झाडापासून ताडी काढायचे परंतु सध्या मात्र काढत नाहीत.
फोटो: महादु चिंधु कोंडार
पूर्वीच्या काळात म्हणजे आजोबांच्या कालखंडात एक “मानमोडी” नावाचा आजार प्रसिद्ध होता. अचानक व्यक्तीची मान वाकडी होऊन जायची. आजच्या युगातील लकवा किंवा पॅरालिसिस सारखा आजार असे म्हणता येईल. तेव्हा लोक शिंदीचे लहान डोक्याएव्हढे उंच वाढलेले झाड तोडून त्यातील पांढऱ्या-पिवळट रंगाचा गर काढून घ्यायचे. त्याला आमच्या ग्रामीण भाषेत “काला” म्हणतात.
हा काला झाडातून काढल्या काढल्या लगेच खावा लागतो. त्याचा हवेशी जास्तवेळ संबंध आल्यास कडू होतो. काही लोक हा काला पाण्यात ठेवून त्याचे पाणी पितात. याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते व कोणत्याही आजाराची लागण पटकन होत नाही असे सांगितले जाते.
फोटो: महादु चिंधु कोंडार
आम्ही पण – गुलाब, तुकाराम, बाबा, पंडित, महादू या वर्षी २०२० मधे कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना या शिंदीच्या झाडाचा काला काढून खाल्ला व परिवारातील सदस्यांनापण खाऊ घातला.
फोटो: महादु चिंधु कोंडार
शिंदीच्या मोठ्या झालेल्या झाडाला खारकाच्या आकाराएव्हढी लांबट फळे येतात. फळे परिपक्व झाल्यास पिवळी-नारंगी रंगाची दिसतात. फळे पिकल्यावर मातेरी काळपट तपकिरी रंगाची दिसतात. ही फळे खातात. त्यांना शिंदोळा म्हणतात.
फोटो: महादु चिंधु कोंडार
महाराष्ट्रात सह्याद्रीच्या हरिश्चंद्र डोंगर रांगेत शिंदोळा नावाची डोंगर रांग आहे. ती कुमशेत गाव व धामनवन गाव यांना जोडते. त्यातील कुमशेत गावाच्या परिसरात असलेल्या मुडा नावाच्या डोंगर रांगेत या शिंदीचे प्रमाण जास्त आहे व शिंदोळा देखील जास्त आहेत. शिंदीची पाते एकमेकांना गाठ बांधून त्यावर बसून किंवा काठीने झोडपून शिंदोळा पाडावे लागतात. मी इयत्ता ८वीत शिक्षण घेत असतांना झोपाळ्यासारखी गाठ बांधून शिंदोळा तोडली होती.
फोटो: महादु चिंधु कोंडार
हे झाड शेतात लोकांना नको असते कारण या झाडाला पूर्ण काटेच काटे असतात. शेतात काम करतांना इजा होण्याची शक्यता असते म्हणून लोक या वृक्षाचा तिरस्कार करतात.
लहानपणी शिंदीची वाकलेली फांदी खाली पडलेली दिसली तर ती घरी घेऊन यायचो व आम्ही लहान पोरं कोयत्याच्या साहाय्याने फांदीचे काटे तोडून गाडी-गाडी खेळायचो. आम्ही लहानपणी या शिंदीच्या झाडाच्या पातीची अंगठी विणून बोटात घालायचो आणि आनंदाने मिरवायचो.
काही वैद समाजातील लोक झाडू तयार करण्यासाठी या शिंदीच्या फांद्या तोडून नेतात व ज्याच्या शेतातील शिंदीची पाते तोडली त्या शेतकऱ्याला प्लास्टिकच्या धाग्याने विणलेली चऱ्हाटे देतात.
फोटो :गोरक्ष बारामते
या शिंदीच्या अगदी मधोमध एक पांढऱ्या पिवळट रंगाचा तुरा आलेला असतो. या तुऱ्याच्या पानांचा उपयोग गोरक्ष बारामते याने आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून केला. ते तुरा तोडून आणतात आणि थोडा सुकल्यानंत त्यातून टोपी, फुलदाणी व झाडासारखे दिसणारे वेगवेगळे आकार तयार करतात.
फोटो: महादु चिंधु कोंडार
अशा या कुचकामी शिंदीचे अनेक कलाकुसरी साठी उपयोग गोरक्ष बारामते यांनी आपल्या कल्पकतेने दाखवले.
सांगायचे तात्पर्य एकच की नैसर्गिक गोष्ट कोणतीही असो, आपण तिची जपणूक करणे गरजेचे आहे. प्रत्येक वनस्पतीचा – अगदी निरुपयोगी गवताचा सुद्धा – मानवी जीवनाशी अखंड संबंध आहे याचा विसर आपणाला पडायला नको. कारण निसर्गातील कोणती गोष्ट कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही.
फोटो: महादु चिंधु कोंडार
Read this story in English